सुरेश प्रभूंच्या ट्वीटने नवी मुंबई प्रशासन संभ्रमात
ऐरोली आणि कळवा या उपनगरांच्या मधोमध वसलेल्या दिघा परिसरात रेल्वेने तब्बल १५० वर्षांपूर्वी बांधलेल्या लहानग्या धरणातील पाण्यावर नवी मुंबईपाठोपाठ आता ठाणे महापालिकेनेही हक्क सांगितल्याने या मुद्दय़ावरून दोन्ही शहरांमधील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात संघर्षांची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. स्वत:च्या मालकीचे धरण असूनही यंदा नवी मुंबईला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने सातत्याने पाठपुरावा करून आणि जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या मध्यस्थीने रेल्वेकडून या धरणातील पाणी पुढील तीन महिन्यांसाठी उचलण्याची परवानगी पदरात पाडून घेतली. हे धरण जेमतेम चार दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचे आहे. त्यामुळे दिघ्यातील काही टंचाईग्रस्त भागाला धरणातून पाणी उचलून टँकरने पुरविण्याची योजना नवी मुंबई महापालिकेने आखली आहे. असे असताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी येथील पाणी ठाण्याला देण्यासही हिरवा कंदील दाखविल्याने नवी मुंबईतील राजकीय नेते आणि प्रशासन अवाक झाले आहे.
दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून हे धरण बांधले. पुरेशा देखभाल दुरुस्तीअभावी या ब्रिटिशकालीन धरणांच्या भिंतीमधून आता पाणी पाझरत आहे. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी हिल्टन यांनी ही जागा शोधली. रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाची बांधणी सुरू केली तेव्हा या धरणाची उभारणी केली. रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या या धरणाची क्षमता चार ते पाच दशलक्ष लिटर इतकी आहे. २० एकर परिसरात हे धरण आहे. ते ४० फुटांपेक्षा जास्त खोल आहे. म्हणजे जेमतेम २५ ते ३० हजार रहिवाशांना पुरेसे इतकेच पाणी येथून पुरविले जाऊ शकते. या धरणातील पाणी टँकरच्या साहाय्याने उचलण्यास मंजुरी मिळावी यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि खासदार राजन विचारे यांनी गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला होता. अखेर नवी मुंबईकरांना पुढील तीन महिन्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या धरणातील पाणी अत्यंत दूषित आहे. त्यामुळे टँकरमध्ये ते भरून घ्यायचे आणि त्यावर प्रक्रिया करून आसपासच्या पाडय़ा, झोपडय़ांना ते धुणी, भांडी तसेच तत्सम वापरासाठी ते पुरवायचे अशी नवी मुंबई महापालिकेची योजना आहे. त्यासाठी २४ लाख रुपयांचा एक तातडीचा प्रस्तावही पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. असे असताना ठाणे महापालिकेनेही कळवा, विटावा परिसरासाठी या पाण्यावर दावा केला आहे.

राजन विचारेंचीही कोंडी
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही ट्वीट करत ठाणे शहराला या धरणातून पाणी पुरविण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केल्याने इवल्याशा धरणातील पाणी दोन्ही शहरांना कसे पुरविणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या धरणातील पाणी नवी मुंबईला मिळावे यासाठी आग्रह धरणारे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचीही प्रभू यांच्या ट्वीटमुळे कोंडी झाली असून नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.