महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा पुढाकार; दर महिन्याला बैठक होणार

ठाण्यासह आसपासच्या शहरातील रेल्वे तसेच परिवहन सेवेवरील भार कमी करण्यासाठी जलवाहतूकीचा प्रकल्प राबविण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे. या उपक्रमाला चालना देण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या समितीची दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका मुख्यालयात बुधवारी झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र मेरीटाम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन, मीरा भाईंदर, वसई विरार आणि भिवंडी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी आणि कल्याण या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या संकल्पनेचे केंद्रीय भुपृष्ठ आणि सागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नुकतेच सादरीकरण करण्यात आले होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे सादरीकरण केले होते. यावेळी गडकरी यांनी या संकल्पनेला तत्वत: मंजूरी दिली होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पुढाकाराने महापालिका मुख्यालयात बुधवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये या भागातील जलवाहतुक सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार या बैठकीमध्ये या भागातील जलवाहतुक सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.करणे, त्याच्या तांत्रिक बाबी तपासणे,केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याच्या कामांसाठी एका संयुक्त समितीची स्थापना करून त्या समितीचे दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य अभियंता एच. एस. पगारे, सागरी जलवाहतूक सल्लागार कॅप्टन खत्री, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त अच्युत हांगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुभाष वाघमारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख बोरसे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, डिलीव्हरी चेंज फाऊंडेशन, एएसटी आणि वॅपकॉम या  संस्थेचे पदाधिकारी  उपस्थित होते.

कोलशेत हे जलवाहतूकीचे मुख्य केंद्र..

ठाणे अंतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गावर जलवाहतूक सुरू करणे तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण, ठाणे-भिवंडी आणि ठाणे-बोरिवली आदी मार्गावर जलवाहतूक सेवा प्रस्तावित करण्यात येणार आहे. या जलवाहतूक प्रकल्पाचे मुख्य वाहतूक केंद्र हे कोलशेत येथे बनविण्यात येणार असून या ठिकाणी प्रतिक्षा कक्ष, पार्किंग व्यवस्था, तिकीट काऊंटर यासह सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव या महानगरपालिकांच्या सहमतीने संयुक्त समितीच्या वतीने तयार करण्यात येणार असून तो केंद्र शासनास सादर करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

गायमुख येथे जेटी बांधणे, त्या परिसराचे सौंदर्यीकरण करणे तसेच ते स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे याबाबत चर्चा होऊन हा प्रकल्प मार्चअखेर पूर्ण करण्यात येईल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे खाडीला मिळणाऱ्या नाल्याची अरूंद मुखे वाढविण्याबाबत महापालिकेस पुर्ण सहकार्य करणार आहे.

-अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड