03 March 2021

News Flash

सुरेल, आकर्षक ‘नवरंग’ वसईत झळकले!

सध्या या आकर्षक पक्ष्याचे वसईमध्ये आगमन झाले असून त्याच्या दर्शनाने पक्षिमित्र सुखावले आहेत.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात नऊ रंगांची छटा असलेला आणि सुरेल शीळ वाजविणारा नवरंग पक्षी दक्षिणेकडून कोकणात विणीसाठी येत असतो. सध्या या आकर्षक पक्ष्याचे वसईमध्ये आगमन झाले असून त्याच्या दर्शनाने पक्षिमित्र सुखावले आहेत.

मे महिन्यातील तप्त वातावरणात ‘व्ही टय़मू व्ही टय़ू’ अशी सुरेल शीळ कानावर पडायला लागली की समजायचे ‘इंडियन पिट्टय़ा’ म्हणजेच नवरंग पक्षी दाखल झाला. मे ते ऑगस्ट हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे दक्षिण भारतातून ते वसईमध्ये येत असतात. ऑगस्टनंतर ते पुन्हा दक्षिण भारतात जातात. या वेळी अगदी नियोजित म्हणजेच २० मे रोजी नालासोपारा येथील निळेमोरे भागात पक्षिमित्र मिलिंद बाईत यांना हा पक्षी आढळून आला आहे. या ठिकाणी नवरंग पक्ष्याची जोडपी दिसून आली. दोन दिवस सतत ही जोडपी निदर्शनास येत होती. त्यानंतर वसईतील तुंगारेश्वर भागात हा नवरंग आढळून आला असल्याचे पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले. नवरंग हा स्थानिक स्थलांतरित करणारा पक्षी असून भडक रंगीबेरंगी पेहरावामुळे तो सर्वाना आवडतो.

झुडपी, जंगले, पानझडी जंगले ही ठिकाणे आवडती असल्याने मुख्यत: या ठिकाणी जमिनीवर उडय़ा मारत फिरताना आढळतो. म्हणून त्यास भुचरपक्षीसुद्धा म्हणतात. त्याची दुहेरी प्रकारची शिळी कानावर पडताच तो कोणत्या भागात आहे हे अचूक ओळखण्यात येत असल्याचे मेन यांनी सांगितले.

विविध रंग

पाठीवर हिरवा, निळा, पोटावर व डोक्यावर पिवळा, डोळय़ापाशी काळा, चोच लालसर, डोक्याचा खालचा भाग पांढराशुभ्र, पिसे हिरवी, निळी, लाल, नारंगी रंगाची अशा प्रकारे विविध रंग या पक्ष्याला असतात.]

बेसुमार जंगलतोड, हवा-पाणी-वायू प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देत स्थलांतर साधत असतात. प्राणी गटातील सर्वात यशस्वी गट म्हणून पक्ष्यांना संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे स्थलांतर आणि परिस्थितीशी जमवून घेणे. मात्र मानवाच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवासावर दिवसेंदिवस गंडांतर आले आहे. त्यामुळे वसईतील मुख्यत: तुंगारेश्वर भागात पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे करायला हवेत.

– सचिन मेन, पक्षी अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:30 am

Web Title: navrang birds in vasai
Next Stories
1 हेल्मेटसक्तीसाठी वरातीमागून घोडे
2 गावी गेल्याचे स्टेट्स टाकले आणि चोरांनी घर लुटले!
3 अर्नाळय़ाच्या जंगलात हातभट्टीचा खुलेआम धंदा
Just Now!
X