|| ऋषिकेश मुळे/ नीलेश पानमंद

ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या सजावटीसाठी सुरक्षा नियम धाब्यावर

ठाण्यातील खोपट भागातील टीएमटीच्या थांब्यावरील जाहिरात फलकामुळे विजेचा झटका बसून प्रवाशाला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच शहराच्या विविध भागांतील नवरात्रोत्सव मंडळांनी वृक्षांवर रोषणाई केल्यामुळे वृक्ष आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवरही दुष्परिमाण होण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठाणे शहरात सार्वजनिक नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी नियम पायदळी तुडवले जात आहेत. रस्त्यांवर उभारलेल्या मंडपांमुळे वाहतूककोंडी होत असतानाच मंडळांनी रस्त्यालगतच्या वृक्षांवर रंगीबेरंगी वीजदिव्यांच्या माळा सोडल्या आहेत. या रोषणाईमुळे संध्याकाळी परिसर आकर्षक दिसत असला तरी ही रोषणाई वृक्षांसाठी घातक आहे. शिवाय त्यामुळे नागरिकांनाही इजा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रोषणाईसाठी लावलेल्या माळांमधील वीजप्रवाह वृक्षांमध्ये उतरू शकतो आणि त्या वृक्षाला पदपथावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा स्पर्श झाल्यास इजा होऊ शकते किंवा जीवही गमावावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. समतानगर, नौपाडा, नितीन कंपनी तसेच अन्य भागांत वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची रोषणाई करण्यात राजकीय मंडळे आघाडीवर आहेत.

समतानगर भागातील रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या फांद्यांवर विद्युत माळा सोडण्यात आल्या आहेत. नौपाडा येथील भगवती शाळेजवळील नवरात्रोत्सव मंडळानेही अशाच प्रकारची रोषणाई केली आहे. वाऱ्यामुळे या माळा खाली लोंबकळतात. त्या वृक्ष आणि परिसरातील रहिवाशांसाठी धोक्याच्या ठरू शकतात. त्यामुळे पालिकेने अशा मंडळांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मंडळांना परवानगी देतानाच काही सूचना केल्या जातात. त्यामध्ये वृक्षावरील विद्युत माळांमुळे दुर्घटना होऊ नयेत यासाठीही सूचना केल्या आहेत.  नियमावलीचे उल्लंघन झाले तर सहायक आयुक्तांमार्फत त्या मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते.   – ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त, ठाणे महापालिका

विद्युत माळांमुळे वृक्षांचे जैविक चक्र बिघडण्याची दाट शक्यता असते. झाडांना प्रकाशाची गरज असते, परंतु मानवनिर्मित विजेच्या उपकरणांमधून निर्माण केला जाणारा प्रकाश वृक्षाच्या जवळ आणि जास्त काळ संपर्कात आल्यास तो वृक्षाच्या वाढीसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते.   – सीमा हर्डीकर, संस्थापक, फर्न