डावखरे समर्थकांची पक्षाला सोडचिठ्ठी; नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

विधान परिषद निवडणुकीत मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांच्या समर्थक नगरसेवकांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गळाला लावण्याची जणू स्पर्धाच सध्या ठाण्यातील शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये रंगली असून वागळे इस्टेट भागातील डावखरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नगरसेवक योगेश जानकर यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. दोनच दिवसांपूर्वी घोडबंदर भागातील मनोहर डुंबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला या भागातून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेताना घाम फुटणार आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल ३४ नगरसेवक निवडून आले होते. ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वसंत डावखरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड असे दोन गट असून साडेचार वर्षांपूर्वी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने आव्हाड यांचे राजकीय वजन काही प्रमाणात वाढले होते.

नुकत्याच झालेल्या नव्या प्रभाग रचनेत कळवा-मुंब्रयात तब्बल चार जागा वाढून त्या ३६ झाल्या आहेत. ठाणे शहर तसेच आसपासच्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी सुरू केले असून त्याचा सर्वाधिक फटका आतापर्यत वसंत डावखरे यांना बसला आहे.

काही दिवसांपूर्वी डावखरे यांचे कोपरी भागातील  समर्थक नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत तर भरत चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला  धक्का बसला होता. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे घोडबंदर भागातील  नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष फुटिरांच्या या रांगेत शनिवारी वागळे इस्टेट भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश जानकर हेदेखील जाऊन बसल्याने डावखरे यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या निवडणुकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या प्रभागातून जानकर यांनी शिवसेना उमेदवाराला धूळ चारली होती. ठाणे शहरातून राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसत असताना कळवा-मुंब्यातून मात्र पक्षाचा एकही नगरसेवक आतापर्यंत तरी बाहेर पडलेला नाही.

नगरसेवकांची पळवापळवी सुरूच

निडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकएक नगरसेवक शिवसेना-भाजपच्या जाळ्यात अडकू लागला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही युतीच्या नेत्यांनी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांना गळाला लावले होते. ठाण्यातही याच रणनीतीचा अवलंब करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांना आतापर्यंत फोडण्यात युतीचे नेते यशस्वी ठरले आहे.