जयेश सामंत

भाजपचेही आगीत तेल

ठाण्याचा खासदार कसा असावा, उच्चशिक्षित की अल्पशिक्षित’ या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या आक्रमक प्रचाराला ठाण्यातील भाजप नेत्यांकडूनही पडद्यामागून साथ मिळू लागल्याने इतके दिवस युती झाल्याने खुशीची गाजरे खाणाऱ्या शिवसेनेच्या गोटात चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.

ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार आनंद परांजपे या उच्चशिक्षित उमेदवाराला ठाण्यातून रिंगणात उतरवून राष्ट्रवादीने खासदार राजन विचारे यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरुवात केली आहे. हे करत असताना कोपरी, नितीन कंपनी पूल धोकादायक होऊनही शिवसेना आणि खासदारांना सोयरसुतक नसल्याचा मुद्दा उपस्थित करत या निवडणुकीत स्थानिक मुद्दय़ांना महत्त्व देण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

युतीच्या जोरावर लाखांच्या मताधिक्याचे विश्वास असणारे शिवसेनेचे नेते या मुद्दय़ावर सध्या मौन धारण करून आहेत. आनंद परांजपे यांनी ठाणे, कल्याणच नव्हे तर मुंबई उपनगरीय रेल्वेचे अनेक प्रश्न लोकसभेत मांडले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसने परांजपे यांची उमेदवारी जाहीर होताच ठाण्याचा खासदार कसा असावा, उच्चशिक्षित की अल्पशिक्षित असा प्रचार सुरू केल्याने शिवसैनिकांची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीने ठाण्यात उभारलेल्या फलकांची चर्चा शहरभर सुरू असताना भाजपचे नेते मिलिंद पाटणकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत खासदार उच्चशिक्षितच असावा अशी भूमिका मांडत शिवसेनेला चिमटा काढला आहे. तसेच ठाण्याचा खासदार रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे यांच्याप्रमाणे अभ्यासू असावा आणि नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणारा नसावा असे मत व्यक्त करत विचारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

ठाणेकरांसाठी महत्त्वाचे कोपरी आणि नितीन कंपनी उड्डाणपूल धोकादायक ठरूनही शिवसेनेने बघ्याची भूमिका घेतली. एकनाथ िशदे यांचे निवासस्थान तर नितीन कंपनी पुलापासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना या पुलाच्या दुरुस्तीत एवढा उशीर का लागतो तसेच या कामाच्या कंत्राटातून ठरावीक मलिदा मिळायचे नक्की होत नाही तोवर ते सुरूच होणार नाही का असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. सत्ताधारी म्हणून शिवसेनेने त्याचे उत्तर द्यावे.

– आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे उमेदवार

गेली ३५ वर्षे जनतेने मला विविध पदांवर निवडून दिले असून त्यांच्याशी आजवर मी प्रामाणिक राहिलो आहे. त्यामुळेच त्यांनी  विजयी केले आहे. जो व्यक्ती पक्षाशी आणि जनतेशी प्रामाणिक नाही आणि स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात उडय़ा घेतो, त्याला जनताच धडा शिकवेल. यापूर्वी कल्याणच्या पराभवानंतर ‘गद्दार’ आता ठाण्यात आला असून येथील जनताही जागा दाखवून देईल.

– राजन विचारे, शिवसेना खासदार