स्मित ओल्ड एज होम अ‍ॅण्ड केअर फाऊंडेशन

ठाणे : निराधार, एकाकी, असहाय वृद्धांचा आधार बनलेल्या आणि त्यांच्यासाठी तीन दशकांपासून काम करणाऱ्या भिवंडीतील ‘स्मित ओल्ड एज होम अ‍ॅण्ड केअर फाऊंडेशन’ला मोठा वृद्धाश्रम उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. किमान तीन हजार ज्येष्ठांना आश्रय देता येईल एवढा वृद्धाश्रम उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

रस्त्याच्या कडेला आश्रय घेतलेले, रेल्वे स्थानकांवर एकाकी अवस्थेत असलेले, सरकारी रुग्णालयांत वृद्धापकाळातील आजारांवर उपचार घेणारे आणि मुलांनी जबाबदारी झटकल्याने निराधार  झालेल्या ज्येष्ठांचा वृद्धापकाळ सुसह्य करण्यासाठी ‘स्मित ओल्ड एज होम अ‍ॅण्ड केअर फाऊंडेशन’ ही संस्था झटत आहे. ठाणे आणि भिवंडी शहरांच्या मध्यभागी वसलेल्या काल्हेर गावात एका इमारतीत हा वृद्धाश्रम चालविला जातो. संस्थेच्या संस्थापिका योजना घरत हे काम सेवाभावी वृत्तीने करीत आहेत. निराधार वृद्धांना आधार देण्यासाठी संपूर्ण देशभरातून या वृद्धाश्रमाकडे मदत मागितली जाते.

लहानपणीच वयोवृद्धांची सेवा करण्याची शिकवण आणि अनुभव मिळाल्याने योजना घरत यांनी १९९३ मध्ये पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील सरावली गावातील एका मंदिराच्या पडीक जागेवर ‘आश्रय’ या नावाने पहिला वृद्धाश्रम सुरू केला. त्यांनी १९९३ ते २००० अशी आठ वर्षे १५० ज्येष्ठांचा सांभाळ करत हा आश्रम उत्तम रीतीने चालविला. आश्रमातील ज्येष्ठांची संख्या वाढू लागल्याने त्यांना बोईसर येथील मंदिराची जागा सोडावी लागली. त्यानंतर मोठ्या जागेच्या गरजेपोटी पालघर तालुक्यातील वाडा आणि त्यानंतर पनवेल अशा दोन ठिकाणी आश्रम स्थलांतरित करावा लागला. अखेर त्यांनी २०१३ मध्ये भिवंडीजवळच्या काल्हेर गावात अर्धा एकर जागेवर छोटेखानी तीन मजली इमारतीत वृद्धाश्रम सुरू केला आणि ‘स्मित ओल्ड एज होम अ‍ॅण्ड केअर फाऊंडेशन’  संस्थेची स्थापना केली.

आठ वर्षांपासून ‘स्मित’ वृद्धाश्रमात ९० वयोवृद्घांचा सांभाळ केला जातो. स्मित वृद्धाश्रमात दाखल होण्यासाठी देशभरातील पाच हजार निराधार वृद्ध प्रतीक्षेत आहेत. पुरेशा जागेअभावी वृद्धांचा सांभाळ करणे संस्थेला अशक्य झाले आहे. त्यात अनेक वृद्ध अपंग आहेत. काही मतिमंद आहेत, तर काहींना असाध्य आजार आहेत. वृद्धांवर लक्ष ठेवण्यासाठी आश्रमाच्या आवारात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची गरज आहे. तसेच किमान तीन हजार वृद्धांना हक्काचा निवारा देण्यासाठी स्वतंत्र खोल्या असलेला वृद्धाश्रम उभारण्याचे संस्थेचे नियोजन आहे. स्मित वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी कायमस्वरूपी हक्काचा निवारा उभारण्याचे संस्थेचे ध्येय आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.