अकरा महिने शाळा, आभ्यास, गृहपाठाच्या कटकटीतून सुटका करून घेत मुले बाराव्या महिन्यात म्हणजे ‘मे’च्या सुट्टीत मामाचे गाव गाठत असत. गावाला जाऊन तिथला निसर्ग, तिथले ग्रामीण जीवन आणि पर्यावरण याचा सहवास त्यांना तिथेच मिळत होता. घरामध्ये आजी-आजोबा असत. त्यामुळे जगातील सगळ्यात उत्तम मानले जाणारे पारंपरिक शिक्षण मुलांना मिळे. त्या काळात घरातच संस्कार शिबिरे होत होती. पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना या शाळेबाहेरच्या ज्ञानाचा उपयोग आयुष्यभरासाठी होत होता. जीवनशैली बदलली आणि संयुक्त कुटुंबपद्धती लोप पावत गेली. विभक्त कुटुंबामध्ये मुले आणि आई-वडील इतकेच कुटुंब. त्यामुळे सुट्टी पडल्यानंतर मामाचे गाव नाही की, आजी-आजोबा नाहीत. अशा वेळी शहरामध्ये खासगी ‘संस्कार शिबिरांची’ सुरुवात झाली. शाळेच्या शिक्षिका, क्रीडा शिक्षक एखाद्या गृहिणीकडून अशा संस्कार शिबिराची आखणी केली जात असे तर काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांसाठी संस्कार शिबीर चालवली जात असत. उन्हाळ्याच्या सुट्टीतील या संस्कार शिबिरांनी आता पूर्वीचे अत्यंत छोटेखानी स्वरूप बदलून टाकले असून त्याचा विकास आता ‘समर कॅम्प’च्या नावाने झाला आहे. अत्यंत चकचकीत माहितीपत्रके आणि सुंदर छायाचित्रे यांच्या माध्यमातून पालकांना आपली संस्था इतरांपेक्षा काय वेगळे काय देणार आहे, हे सांगितले जाते. त्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.
पर्यावरण, निसर्ग, कला, भटकंती, साहस, विज्ञान, गणित, रोबोटिक्स, क्रीडा अशा सगळ्या विषयांची ओळख या समर कॅम्पच्या माध्यमातून होऊ शकते. सुरुवातीला अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध होणारे हे कॅम्प आता पालकांचा खिसा खाली करण्यासाठीचा एक मार्ग बनला आहे. शिवाय मुलांना घरी एकटे ठेवण्यापेक्षा समर कॅम्पच्या निमित्ताने त्यांना गुंतवून ठेवणे पालकांना सोयीचे वाटू लागले आहे. आता तर अनेकदा सुट्टीच्या काळात मुलेच आपल्याला नेमके काय करायचे आहे हे ठरवून त्या दृष्टीने आपल्या सुट्टीची आखणी करतात. सकाळी निसर्ग अभ्यास वर्ग, दुपारी गायनाचा वर्ग तर संध्याकाळी रोबोटिक्स कार्यशाळा, असे मुलांचे दिवसाचे वेळापत्रकच तयार होऊ लागले. काही मुले गेल्या वर्षी मी तबला वाजवायला शिकलो आहे, तर या सुट्टीमध्ये मला गिटार शिकायची आहे. गाडी चालवायची आहे, जंगलात राहायचे आहे, ट्रेकिंग करायचे आहे, पोहायला शिकायचे आहे, कराटे शिकायचे आहे, प्राण्याची माहिती घ्यायची आहे, असे एक ना अनेक गोष्टी करायच्या आहेत अशी यादीच विद्यार्थी लिहून तयार करू लागले आहेत. या शिबिरांकडे पाहिल्यानंतर नव्या पिढीचे प्रतिबिंब या शिबिरातून पाहायला मिळू शकते. मुलांच्या आवडीनिवडीची ओळखही या शिबिरामध्ये होऊ लागली आहे.

प्रवेश घेताना हे प्रश्न लक्षात ठेवा..
* शिबिर राबवणाऱ्या संस्थेचा मुख्य उद्देश काय?
* शिकवल्या जाणाऱ्या विषयातील तज्ज्ञ संस्थेकडे आहेत का?
* मुलांना खरच त्या शिबिराला जायचे आहे का, त्याची ती आवड आहे का?
* सहभागी मुलांची संख्या आणि त्यांना पुरवण्यात येणाऱ्या मार्गदर्शकांची संख्या पुरेशी आहे का?
* मुलांसाठी स्वच्छतागृह, अल्पोपहार आणि जेवणाची योग्य व्यवस्था आहे का?
मुलांच्या प्रकृतीची माहिती संस्था चालकांना देणे गरजेचे आहे. त्यांना एखादा आजार काय का, कोणती अ‍ॅलर्जी आहे का, हे सर्व तपशील महत्त्वाचे असतात. संस्थेचा आणि सहभागी प्रशिक्षकांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन ठेवणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते.

मुलांना गुंतवून ठेवणे हाच उद्देश..
मुलांना शिबिरांमध्ये पाठवण्यामागे पालकांचा सगळ्यात पहिला उद्देश मुलांना गुंतवून ठेवणे हाच असतो. आपल्या मुलांने चांगल्या मुलांच्या संगतीत रहावे, चांगले विचार ऐकावेत, कर्तृत्ववान व्यक्तींचा त्याला सहवास लाभावा, अशी पालकांची स्वाभाविक इच्छा असते. शिवाय पुढील आयुष्यात या शिबिरांचा मुला-मुलींना लाभ व्हावा, असाही हेतू त्यामागे असतो. त्यामुळे हल्ली शिबिरांबाबत पालकही जागृत झाले आहेत.  

शिबिरांचे विषय बदलले..
बदलत्या जीवनशैलीचे प्रतिबिंब शिबिरांमध्येही उमटले असून ठरावीक शिबिरांकडे मुले आणि पालक गर्दी करताना दिसत आहेत. विशेषत: करिअर, तंत्रज्ञानविषयक माहिती तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या शिबिरांना अधिक पसंती दिली जाते. अभिनय, गायन, नृत्य, पोहणे, चित्रकला, वस्तू बनवणे या पारंपरिक शिबिरांच्या पलीकडे जाऊन रोबोटिक्स, संगणकीय करामती, इंग्लिश स्पीकिंग, अ‍ॅनिमेशन, पर्यावरण अभ्यास, फिल्म मेकिंग, फोटोग्राफी यांसारख्या शिबिरांकडे पालक मोठय़ा प्रमाणात वळू लागले आहे. अभिनय क्षेत्र हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असला तरी त्यातील तांत्रिक बाजू शिकून घेण्याकडे पालक लक्ष देऊ लागले आहेत. विज्ञानातील करामती जाणून घेणे, हालचाल करणारा रोबो तयार करणे, अ‍ॅनिमेशन फिल्म तयार करणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती अशा नव्या प्रकारांना पसंती वाढत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील ‘चिल्ड्रन्स टेकसेंटर’ ही संस्था मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी शिबिरे राबवत असून त्याकडे पालकांचा कल वाढू लागल्याचे संस्थेचे पुरुषोत्तम पाचपांडे यांनी सांगितले.
श्रीकांत सावंत, ठाणे</strong>