राज्यपालाच्या दौऱ्यानिमित्त ठाणे शहरातील सर्व चौक काही काळाकरिता कसे कोंडीमुक्त झाले यासंबंधीचे वृत्त वाचनात आले. पोलिसांनी मनावर घेतले तर काय घडू शकते याचे दर्शन या बातमीच्या माध्यमातून सर्वाना घडले. ठाण्याचा कोर्ट नाका, टेंभी नाका, नितीन कंपनी चौक, तीन हात नाका, हरिनिवास सर्कल या ठिकाणी सदोदित वाहतूक कोंडी होत असते. तीन पेट्रोल पंप ते हरिनिवास चौकापर्यंत वाहनचालकांच्या बेशिस्तीचे अनेक प्रताप दिवस-रात्र पाहायला मिळतात. या चौकात कोंडी होताच तिचे दुसरे टोक थेट तीन हात नाकापर्यंत पोहोचते. याच भागात ठाणे वाहतूक पोलिसांचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाच्या प्रवेशाद्वारापर्यंत वाहतूक कोंडी होते. तरीही हरिनिवास चौकातील कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ठोस काही होताना दिसत नाही. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त का होईना हे दोन्ही प्रमुख चौक काही काळाकरिता कोंडीमुक्त राहिले हे निश्चितच अभिनंदनास्पद आहे. वाहतूक पोलिसांनी मनावर घेतले तर फारसा खर्च न करताही ठाणे शहर कोंडीमुक्त होऊ शकते हे याचे मोठे उदाहरण म्हणता येईल. पोलीस किती मनावर घेतात, हाच खरा प्रश्न आहे.

सूतिकागृह हवे
डोंबिवलीतील ब्राह्मण सभेजवळ सुधाकुंजसमोरील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सूतिकागृह सध्या बंद स्थितीत आहे. येथे महानगरपालिकेची भरपूर जमीन आहे. त्यामुळे येथे सहा-सात मजली गरीब व मध्यमवर्गीयांसाठी बहुद्देशीय रुग्णालय होणे आवश्यक आहे. जेथे सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे सूतिकागृहासाठी या इमारतीत जागा ठेवावी. चांगले डॉक्टर या रुग्णालयात दिल्यास डोंबिवलीकरांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागणार नाही. येथे रुग्णांना अगदी मोफत सेवा न देता माफक दरांत सेवा देता येईल, जेणेकरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर त्याचा आर्थिक बोजा पडायला नको. या कामासाठी निधी कमी पडत असल्यास खासदार, आमदार किंवा काही सामाजिक संस्थांकडून निधी जमा करावा. डोंबिवली पश्चिमेला महानगरपालिकेचे रुग्णालय असले तरी पूर्वेला रुग्णालय होणे आवश्यक आहे.
– सूर्यकांत पाटणकर, डोंबिवली
मार्ग दुभाजक बसवा
ठाणे पश्चिमेकडील सावरकरनगर नाका बसथांब्याजवळ असलेले मार्ग दुभाजक प्रशासनाने काढून टाकलेले आहेत. यामागचे नेमके कारण माहीत नाही. परिणामी विद्यार्थी, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडणे खूपच जोखमीचे ठरते. तरी या ठिकाणी पूर्ववत मार्ग दुभाजक बसवावेत.
– अशोक परब, ठाणे</p>