अतिरेक्यांशी लढताना २००६ मध्ये जम्मू-काश्मीर येथे वीरमरण आलेल्या शहीद नीलेश संगपाळ यांच्या स्मारकाची दुरवस्था झाल्याचे जवानाच्या वडिलांनीच निदर्शनास आणून दिले. याविषयी प्रसारमाध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या स्मारकाची पाहाणी केली. मात्र पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पहाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीच साधनसामग्री हातात घेऊन या स्मारकाची डागडुजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केली.
शहीद जवानांची आठवण कायम स्मरणात राहाण्यासाठी पालिकेच्यावतीने स्मारकांची उभारणी करण्यात येते, मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. स्वातंत्र्य दिनाला या स्मारकांची स्वच्छता एक दिवसापुरती करण्यात येते. मात्र सर्वच स्मारकांची सफाई होतेच असे नाही. असेच एक उपेक्षित स्मारक कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील आयुक्तांच्या बंगल्यासमोर आहे. शहीद नीलेश संगपाळ यांच्या स्मारकाची गेले कित्येक महिने दुरवस्था झाली असून पालिकेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. नीलेश यांचे वडील मधुकर संगपाळ यांनी पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही पालिकेने त्याची दखल घेतली नाही, यापेक्षा दुदैव आणखी काय असेल, अशी भावना त्या वेळी मधुकर यांनी व्यक्त केली होती. याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना जाग येऊन त्यांनी तात्काळ त्या जागेची पाहणी केली. तसेच ते स्मारक तेथून दुसरीकडे हलविण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. मात्र तो केवळ निवेदनापुरताच मर्यादित राहिला. पालिका व लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५ स्वयंसेवकांनी मिळून १४ ऑगस्टला रात्री या स्मारकाची डागडुजी केली. तुटलेल्या साखळ्या लावल्या, बंदुकीवरील जवानांची टोपी बसविण्यात आली, चौथऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. या कामामुळे स्मारकाची शान पुन्हा आल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला शहरातील दुरवस्थेत असलेल्या स्मारकांची माहितीही नाही. स्मारकाच्या समोरच महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. तसेच या मार्गावरून अनेकवेळा प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय लोकप्रतिनिधी ये-जा करतात. असे असताना एकाचेही या स्मारकाकडे लक्ष जात नाही. वर्तमानपत्रांनी आवाज उठवूनही ढिम्म पालिका प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही. अशा वेळी जनतेनेच लोकशाहीचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिशी उभे राहिल्यास नक्कीच शहरात बदल घडतील, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.