प्रस्ताव महिनाभर लालफितीत; कल्याण-डोंबिवलीतील चाळी, झोपडय़ांमधील फवारणी होत नसल्याने अस्वस्थता

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण :  करोना संसर्ग सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनही होत असल्याचे समोर आल्यानंतरही कल्याण, डोंबिवलीतील या स्वच्छतागृहांच्या निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. नियमित फवारणी व्हावी म्हणून एप्रिलमध्ये मलनिस्सारण विभागाने वरिष्ठांना या संदर्भात अहवाल सादर केला आहे. मात्र अद्याप हा प्रस्ताव पडून आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांची फवारणी रखडली आहे. याबाबत रहिवाशांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृह हे अनेक कारणांपैकी करोना साथ फैलावाचे एक महत्त्वाचे कारण आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या एकत्रित वापरामुळे करोना साथ वाढत असल्याचे तज्ज्ञ समितीकडून निदर्शनास आणल्यावर मुंबई महापालिकेने दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छतागृहांमध्ये जंतुनाशक फवारणी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ८३८ सार्वजनिक स्वच्छतागृहे असून त्यामधील चार हजार २९२ आसनांचा रहिवासी नियमित वापर करतात. या स्वच्छतागृहांची फवारणीही रखडली असल्याचे कळते.

महापालिका एकीकडे सर्व सोसायटी पदाधिकाऱ्यांना सोसायटी आवारातील सार्वजनिक शौचालयाची नियमित देखभाल, फवारणी करा, तेथे हवा खेळती राहील अशी व्यवस्था करण्याचे आदेश देते. असे असताना महापालिका अखत्यारितील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित फवारणी का केली जात नाही, असे प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

पालिका हद्दीत ८००हून अधिक चार हजारहून अधिक आसनांची (सीट) स्वच्छतागृह चाळी, झोपडपट्टय़ा, बस, रेल्वे स्थानक भागांमध्ये आहेत. या स्वच्छतागृहांचा प्रवासी, रहिवासी नियमित वापर करतात. चाळी, झोपडय़ांमधील करोनाबाधित, संशयित रुग्णांकडून अनेक वेळा या स्वच्छतागृहांचा वापर केला जातो. या रुग्णांकडून स्वच्छतागृहाच्या कडीला, दाराला, तेथील साधनांना हात लावला जातो. या गृहांच्या बाहेर हात निर्जंतुकीकरणासाठी कोणतीही व्यवस्था नाही, असे चित्र आहे. कल्याण, डोंबिवली परिसरांतील चाळी, झोपडय़ांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसते. कडोंमपा हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृह ही करोना संसर्गाची केंद्र असल्याचे निदर्शनास आल्यावर मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित जंतुनाशक फवारणी करण्यासाठीचा एक प्रस्ताव या विभागाचे उपायुक्त, आयुक्त यांच्याकडे पाठविला. महिनाभर या प्रस्तावाचा वरिष्ठांनी विचारच केला नसल्याचे सांगण्यात येते. ‘जंतुनाशक फवारणी करायची असेल तर या कामाची निविदा काढा. मग ही कामे ठेकेदारांना द्या’, असे आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सांगितले जाते. रुग्णालय, करोना केंद्र उभारणीची कामे जशी आयुक्तांनी आपल्या अधिकाराखाली केली तसे हे कामही आयुक्तांनी अत्यावश्यक सेवा कायद्याने मंजूर केले तर तातडीने स्वच्छतागृह फवारणीची कामे सुरू करता येईल, असे अधिकारी सांगतात.

पालिका हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित जंतुनाशक फवारणी केली जाते. ही फवारणी विभागवार चक्राकार पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. जुंतनाशकांमधील प्रभावी रसायन टाकून ही फवारणी करण्याचे अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त

कडोंमपा हद्दीत झोपडय़ांमध्ये लागण

कडोंमपा हद्दीत ७४ झोपडपट्टय़ा आहेत. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर रहिवाशांकडून नियमित केला जातो. मोहने, कल्याण पूर्वेतील अनेक झोपडपट्टय़ांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नियमित फवारणी होणे आवश्यक  आहे.