कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर सोमवारी संध्याकाळी अरविंद भिडे या ज्येष्ठ नागरिकांना भोवळ आली. ते जमिनीवर कोसळल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका आणण्यासाठी संपर्क केला. तेव्हा रुग्णवाहिका, स्ट्रेचर नाही आणि डॉक्टरही तेथे हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे. अखेर या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही जागरूक नागरिकांनी या ज्येष्ठ नागरिकाला एका खासगी रुग्णालयात नेले.
प्रसिद्ध वास्तुविशारद अरविंद भिडे सोमवारी पालिकेत त्यांच्या कामानिमित्त आले होते. आयुक्त दालनाबाहेर त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळल्याने सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. भिडे यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून तेथे उपस्थित असलेल्या माजी नगरसेवक भाई देसाई यांनी तात्काळ मुख्यालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लीलाधर म्हसके यांना संपर्क केला. त्या न्यायालयात गेल्या असल्याचे सांगण्यात आले. रुक्मिणीबाई रुग्णालयात भिडे यांना नेण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. तेव्हा रुग्णवाहिका आणि चालक जागेवर नसल्याचे उत्तर देण्यात आले. रुग्णालयात डॉक्टर आहे का या प्रश्नावर नाही, असे उत्तर देण्यात आले, असे देसाई यांनी सांगितले. महापालिका रुग्णालयात अशी अंदाधुंद व्यवस्था असेल तर सामान्य माणसाला वाली कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे. भिडे यांना पालिकेतील एका महिलेने तात्काळ साखरपाणी दिले. श्रीकांत भांगरे, विजय सोनवणे या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर आणून खासगी रुग्णालयात नेण्यासाठी भिडे यांना साहाय्य केले. यासंबंधी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुणीही प्रतिक्रिया देण्यास पुढे आले नाही.