बांधकामांच्या संरक्षित जाळ्यांमुळे ठाण्यातील निसर्गसंपदेचे नुकसान

इमारतीचे बांधकाम करत असताना सिमेंट काँक्रीट तसेच विटा खाली कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी जमिनीपासून काही उंचीवर बसवण्यात येणाऱ्या संरक्षित जाळ्या आता झाडांसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. बांधकामाचा राडारोडा झेलण्यासाठी असलेल्या जाळ्या रस्त्यालगतच्या झाडांना बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बांधकाम कचऱ्याच्या भाराने झाडे एका बाजूला झुकू लागली आहेत. तसेच त्यांना पालवी फुटणेही बंद झाल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणात आढळून आले आहे.

इमारत बांधकामाच्या ठिकाणी साहित्य खाली कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी संरक्षित जाळ्या बसवण्यात येतात. त्याचप्रमाणे नौपाडा पोलीस ठाण्याजवळ महात्मा गांधी मार्गावरील ‘ट्रॉपिकल इलाइट’ या इमारतीच्या बांधकामासाठी या रस्त्यावरील झाडांच्या आधाराने जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या भागातील सहा वृक्षांना ही जाळी करकचून बांधण्यात आली आहेत. त्यामुळे इमारतीच्या बांधकामादरम्यान पडणारा राडारोडा या जाळीत पडल्यावर त्याचा भार थेट या झाडांवर पडतो. त्यामुळे ही झाडे एका बाजूला झुकली आहेत. तसेच त्यांना पालवी फुटणेही बंद झाले आहे. या जाळय़ांमध्ये पडलेले डेब्रिज लगेच हटवण्यात येत नसल्याने या झाडांवरील भार वाढत चालला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात हा राडारोडा भिजल्याने या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या २०१६- १७ च्या पर्यावरण अहवालानुसार ठाणे महानगरपालिकेकडून वृक्ष मोजणीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. मात्र त्या यंत्रणेत वृक्षांची अवस्था कशी आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, यासंदर्भात विचारणा केली असता, ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी ‘वृक्षांना अशा प्रकारे नायलॉनचा फास लावणे चुकीचे आहे. या घटनेची चौकशी करून त्वरित संबंधितांवर कारवाई केली जाईल,’ असे स्पष्ट केले.