News Flash

ठाणे, पालघर जिल्ह्यंत ‘एटीएस’ला बळ!

कोकणपट्टय़ातील दहशतवादविरोधी पथकात नव्या नेमणुका

कोकणपट्टय़ातील दहशतवादविरोधी पथकात नव्या नेमणुका

काळय़ा पैशाला अटकाव घालण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे पावले उचलली असतानाच, आता घातपाती कारवायांनाही प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने आखणी सुरू केली आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणपट्टय़ात संभाव्य दहशतवादी कारवायांना आधीच आळा घालण्यासाठी या भागातील दहशतवादविरोधी पथकाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोकणपट्टय़ातील दहशतवादविरोधी पथकात दोन पोलीस निरीक्षकांसह ३८ नव्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

देशात किंवा राज्यात यापूर्वी घडलेल्या दहशतवादी घटनांच्या तपासाचे धागेदोरे अनेकदा ठाणे जिल्हा अथवा कोकणच्या किनारपट्टीपर्यंत येऊन पोहचतात असा अनुभव आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह कोकणपट्टय़ातील दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच अशा कारवायांना रोखण्यासाठी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने यापूर्वीच ठाणे युनिटची निर्मिती केली आहे.

सात वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात ठाणे युनिटची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या पथकातील मनुष्यबळ अतिशय अपुरे आहे. त्यामुळे विस्तीर्ण अशा सागरी किनाऱ्यासह जवळपास पाच जिल्ह्यांमधील घातपाती कारवायांवर लक्ष ठेवताना या पथकाला अनेक अडचणी येतात. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारच्या गृहविभागाने ठाणे पथक कायमस्वरूपी करून ३८ नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

किती बळ वाढणार?

  • ठाणे युनिटला याआधीच एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पाच सहायकपोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि १५ कर्मचारी असे मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे.
  • यामध्ये ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
  • यात आता वाढ करण्यात आली असून ३८ नवीन अधिकारी-कर्मचारी ठाणे युनिटला मिळणार आहेत.
  • त्यात दोन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस हवालदार, १२ पोलीस नाईक, १० पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

दहशतवादाचे ठाणे, कोकण कनेक्शन

  • ठाणे युनिटच्या क्षेत्रात ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हे येतात. या परिसराला मोठय़ा प्रमाणात सागरी तसेच खाडीकिनारा लाभला आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर सागरी मार्गाने असलेला दहशवाद्यांचा धोका स्पष्ट झाला आहे.
  • बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेचे पदाधिकारी भिवंडीत वास्तवास असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
  • काही वर्षांपूर्वी नागला बंदर आणि मुंब्रा परिसरातून पोलिसांना स्फोटकाचा मोठा साठाही सापडला आहे.
  • मुंब्रा, भिवंडी, पडघा आणि कल्याण अशी संवेदनशील ठिकाणे या पट्टय़ात आहेत. आयसीस या दहशतवादी संघटनेचे हस्तक असल्याच्या संशयावरून मुंब्य्रातून काही जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 12:02 am

Web Title: new appointments in anti terrorism squad
Next Stories
1 दिव्यात घोषणाबाजी; भिवंडीत लाठीमार
2 १०० रुपयांचा काळा बाजार तेजीत
3 पेट टॉक : शेतकऱ्यांचा मित्र बोरझोई
Just Now!
X