हिवाळ्यात भारतात अनेक परदेशी पक्षी येतात. वसईमध्ये असे अनेक पक्षी दाखल झालेले नुकत्याच झालेल्या पक्षीगणनेमध्ये दिसून आले आहे. यात प्रवासी पक्षी, निवासी पक्षी, स्थलांतरित पक्षी असे एकूण १५० विविध प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकाच दिवशी पक्षीगणना आयोजित केली होती.

वसईमध्ये ‘नेस्ट’ (नेचर अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट सोसायटी ऑफ ठाणे) या पक्षी मित्र संस्थेतर्फे रविवारी वसईतील विविध ठिकाणी पक्षीगणना करण्यात आली. या वेळी बोईसर ते मुंबई भागातील पक्षी मित्र, वन्यजीव छायाचित्रकार यांनी वसई तालुक्यातील पाणथळी, समुद्रकिनारे, जंगल, धरणे अशा विविध पक्षी अधिवासांना भेटी दिल्या. वसईतील मिठागरे, भुईगाव व अर्नाळा येथील समुद्रकिनारा, तुंगारेश्वर जंगल, पेल्हार व पापडखिंड धरण या ठिकाणांना भेट देऊन त्यांनी तेथील पक्षी प्रजातींच्या नोंदी घेतल्या. सदर गणनेमध्ये शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदविला होता. पक्षीगणनेमध्ये रंगीत करकोचे, श्वेत करकोचे, मुग्ध बलाक, खंडय़ा, बगळे, राखी बगळे, वंचकी, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, देशी तुतारी, पाणकावळे इत्यादी पाणपक्षी दिसले. तर घार, तुरेवाला सर्प गरुड, पायमोज गरुड, दलदली हरीण, शिक्रा, कापसी, केकर हे शिकारी पक्षी दिसून आले. पायमोज, वटवटय़ा, झुडपी गप्पीदास, चीफचॅक पर्ण वटवटय़ा, दगडी गप्पीदास, बुलबुल, खाटीक रानभाई इ. झुडपातील पक्षी दिसले. तर काळ्या शेपटीचे मालगुजे, युरेशियन काल्र्यू, तुतारी, अश्मान्वेशी, सुरय, सॅडरलिंग, सो न चिखले, खेकडा चिखल, कालवफोडय़ा, कुराण इत्यादी समुद्र पक्षी दिसले. जंगलात पक्षी मित्रांना कुहुवा, पहाडी अंगारक, सोनकपाळ पर्ण पक्षी, शिपाई बुलबुल, कवडे, महाभृंगराज, टकाचोर, सुतार, मोर इत्यादी पक्ष्यांचे दर्शन झाले. तर ग्रामीण भागात कोकीळ, मैना, चिमण्या, भारद्वाज, हळद्य, दयाळ, तांबट इत्यादी पक्षी दिसले. असे साधारणत: १५० पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्याचे नेस्टचे अध्यक्ष सचिन मेन यांनी सांगितले.

गणनेमुळे पक्ष्यांची परिस्थिती तर समोर येतेच, पण त्याचबरोबर पक्षी हा निसर्गाच्या आरोग्याचा निदर्शक असल्याने अशा गणनेमुळे पर्यावरणीय सद्य:स्थितीही कळते. तसेच मुख्यत: हिवाळ्यात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारचे पक्षी या कालावधीत दाखल झाले आहेत हे समजते. आपल्या परिसरात स्थलांतरित पक्षी ज्या भागातून येतात त्या भागात किंवा स्थलांतर मार्गातही पर्यावरणात जे बदल होत असतात त्यांचं प्रतिबिंब या गणनेत दिसतं.  – सचिन मेन, नेस्ट संस्थेचे अध्यक्ष आणि पक्षी अभ्यासक