घरातून पळून जाऊन समाजाकडून उपेक्षेची वागणूक मिळालेली मुले ‘समतोल’च्या माध्यमातून पुन्हा घराकडे जातात. घरी परतलेल्या या मुलांच्या वागणुकीत समतोलच्या संस्कार वर्गातून कमालीचा फरक पडतो. त्यामुळेच संध्याकाळी शुभंकरोती, प्रार्थना म्हणणे, घरच्या सर्वाना नमस्कार करणे, सगळ्यांशी आदराने बोलणे आणि नियमित शाळेत जाणे या गोष्टी ते आवर्जून पाळतात, असे अनुभवकथन नुकतेच ठाण्यात आयोजित पालक मेळाव्यात करण्यात आले.घरातून पळून गेलेली मुले समतोल फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुन्हा घरात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील घडामोडींचा वेध घेण्यासाठी ‘एक दिवस आनंदाचा’ या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मुलांच्या पालकांनी उपस्थितांसमोर अनुभवकथन केले.समतोल फाउंडेशन संस्थेने घरी पोहचवलेल्या मुले व त्यांचे पालक यांचा मेळावा ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळेत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास भिवंडीतील आकाश कश्यप, उल्हानगरचा रेहान शेख, नूर रेड्डी, जमीर अन्सारी, कल्याणचा सागर गायकवाड, सोनू गायकवाड, हेमंत पाडी, शेख अहमद, अंबरनाथचा इस्टीवन डिसिल्वा, विक्रोळीचा अमीर सहानी, ठाण्यातील सिद्धेश शिंदे ही अकरा मुले आणि त्यांचे पालक उपस्थित होते.पालकांनी त्यांच्या मनोगतात मुलांच्या सवयींमध्ये झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केला. २०१२ ते २०१५ म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कालावधीत पुनर्वसन केलेल्या या मुलांची घरामध्ये वागणूक कशी आहे याचा पाठपुरावा घेण्यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात ही मुले गाणी गाऊन व प्रार्थना म्हणून आनंद साजरा करतात. दुसरी ते दहावीच्या वर्गात हे विद्यार्थी शिकत असून संस्थेच्या शिबिरातून झालेले संस्कार त्यांच्या मनावर कायम असल्याचे त्यांनी या मेळाव्या दरम्यान सांगितले.
समर्पित भावनेने काम करणारी संस्था
समतोल फाउंडेशनने समर्पित भावनेने सुरू असलेले काम राष्ट्रनिर्माणाचे काम असून त्यामुळे उद्याच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकणारे आहे, असे मत आमदार संजय केळकर यांनी या मेळाव्यात व्यक्त केले. आमदार केळकर या संस्थेचे ठाणे कमिटीचे अध्यक्ष व विश्वस्त आहेत. संस्थेच्या पुनर्वसन कार्यामुळे अनेक मुले गुन्हेगारी मार्गाकडे जाण्यापासून वाचली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. विजय जाधव आणि त्यांच्या संस्थेतील स्वयंसेवकांनी चालविलेले काम ईश्वरी कार्य असून त्या कार्याला मदत करण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. मुलुंडच्या भावनाताई प्रधान, उषा केळकर व वसुधा केळकर या मेळाव्याला उपस्थित होत्या. या मुलांना शालेय साहित्यांचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.
घरातून काही ना काही कारणांनी पळून गेलेली मुले कुर्ला, दादर, कल्याण, सीएसटी रेल्वे स्थानकांवर वेगवेगळे अधिकृत-अनधिकृत व्यवसाय करून अथवा भीक मागून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. अशा मुलांना समतोल फाउंडेशन घरी परतण्यासाठी उद्युक्त करतात.
देशातील सर्व राज्यांतून या भागात मुले येत असतात. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम गेली १० र्वष समतोल फाउंडेशन करीत आहे.
आतापर्यंत संस्थेने ५५०० मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर संस्कार केले व त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडे पोहचविण्याचे काम केले आहे.