‘कोकण म्हाडा’च्या शिरढोण, खोणी येथील घरबांधणीला वेग

परवडणाऱ्या घरांच्या शोधात कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाकडे वळत चाललेल्या सर्वसामान्यांसाठी याच भागात एक नवीन नगर आकारात येत आहे. ‘म्हाडा’च्या ‘कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळा’तर्फे कल्याण तालुक्यातील शिरढोण, खोणी गावांच्या हद्दीत तब्बल २६ हजार १९२ घरांची उभारणी सुरू असून येत्या ३६ महिन्यांत ही घरे बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणारी ही घरे अतिशय कमी दरात गरीब कुटुंबांना उपलब्ध होणार आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील गोठेघर, भंडार्ली, बारावे, शिरढोण, खोणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी २२२८ कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या तीन गृह प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी एकूण २१ हजार ५९२ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ४ हजार ६०० सदनिका बांधण्यात येणार आहेत, असे कोकण हाऊसिंग बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.

काटई-बदलापूर रस्त्याने हेदुटणे गावातून तीन किलोमीटर, तर तळोजा-उसाटणे रस्त्याने एक ते दोन किलोमीटर अंतरावर या नवीन वस्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आहेत. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीला या गृहबांधणीचे काम देण्यात आले असून २०२०पर्यंत त्यांना ही सर्व घरे बांधून पूर्ण करावयाची आहेत. इमारत उभारणीचे काम झटपट आणि विनाअडथळा पूर्ण करता यावीत म्हणून अत्याधुनिक प्रकारची यंत्रणा बांधकामांच्या ठिकाणी उभी करण्यात आली आहे. शेकडो कामगार याठिकाणी दररोज राबत आहेत.

‘कार्यादेशापासून तीन वर्षांत ही बांधकामे ठेकेदार कंपनीला पूर्ण करायची आहेत. कामांनी गती घेतली नसल्याचे चित्र बांधकामांच्या ठिकाणी असले तरी वेळेत सदनिका बांधून देण्याचे बांधकाम कंपनीला बंधनकारक आहे, अशी माहिती   कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली.

घरे कुठे, किती?

* कल्याण पश्चिमेकडील बारावे गावच्या हद्दीत आर्थिक दुर्बल घटकांसाठी ८३४ सदनिका. वाहनतळासह १४ मजल्याच्या इमारतींची उभारणी.

* कल्याण तालुक्यातील खोणी गावात सव्‍‌र्हे क्रमांक १६२ वर चौदा मजल्याच्या इमारती. त्यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७ हजार १५० सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ६६० सदनिका.

* खोणीपासून पुढे तीन ते चार किलोमीटर अंतरावरील शिरढोण गावात सात मजली इमारतींची उभारणी. दुर्बल घटकांसाठी १३ हजार ६०८, अल्प उत्पन्न गटासाठी २ हजार ९४० सदनिकांची उभारणी.