22 October 2020

News Flash

नव्या जिल्हा रुग्णालयाची रखडपट्टी

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गरीब रुग्णांना उपचार मिळण्याचे ठिकाण असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| आशीष धनगर

इमारतीच्या बांधकामाला आता करोना नियंत्रणानंतरच मुहूर्त

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जुनी झाल्याने तिथे नवे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षातील मार्च महिन्यानंतर या रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर करून तिथे नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार होते. मात्र, करोनाचे संकट ओढवल्यामुळे या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम तात्पुरते रखडले असून या बांधकामाला आता करोना आटोक्यात आल्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे चित्र आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गरीब रुग्णांना उपचार मिळण्याचे ठिकाण असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. तसेच या रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे अनेकदा प्रकृती खालावलेल्या रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांमध्ये हलवावे लागत होते. त्यामुळे राज्य शासनाने २०१८ मध्ये ठाणे जिल्ह्यासाठी ५७४ खाटांचे अद्ययावत नवे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी लागणाऱ्या जागेच्या शोधासाठी आणि विविध तांत्रिक बांबीमुळे रुग्णालयाचे काम सुरू होण्यास विलंब झाला होता. अखेर काही महिन्यांपूर्वी मार्च महिन्यामध्ये रुग्णालयाचे तात्पुरते ५० टक्के स्थलांतर ठाणे मनोरुग्णालयात आणि ५० टक्के स्थलांतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात असलेल्या नव्या इमारतीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अद्ययावत रुग्णालयाच्या बांधकामासाठी सार्वजानिक बांधकाम विभागाने निविदाही काढल्या होत्या. मात्र, याच काळात जिल्ह्यात करोनाने शिरकाव केल्यामुळे नव्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांना उपचार करण्यासाठी सर्वप्रथम याच रुग्णालयाचे रूपांतर करोना रुग्णालयात करण्यात आले. सध्या जुन्या इमारतीमध्ये काही बदल करून तेथे करोना रुग्णांवर उपचार करण्यास सुविधा पुरविल्या जात आहेत. अद्ययावत केंद्रीभूत प्राणवायू सुविधा आणि २५ खाटांना कृत्रिम श्वसन यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रभाव कमी होईपर्यंत या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना नव्या रुग्णालयासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नव्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचे नकाशे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्राप्त झाले आहेत. हे नकाशे तात्काळ पुढे पाठवण्यात येणार आहेत. करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर नव्या रुग्णालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात येईल. – कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 1:15 am

Web Title: new district hospital after corona control health care center akp 94
Next Stories
1 ठाण्यात ६० टक्के नवरात्रोत्सव मंडळांची माघार
2 नवरात्रीनिमित्त रंगणाऱ्या स्पर्धा यंदा ऑनलाइन
3 सांस्कृतिक कट्ट्यांना जिल्ह्याबाहेर पसंती
Just Now!
X