नवीन दुर्गाडी उड्डाण पूल वाहतूक कोंडीचे जंक्शन; पोहोच रस्त्यांचे नियोजन फसले, वाढत्या लोकसंख्येचे संकट

कल्याण-भिवंडी रस्त्यावर दुर्गाडी येथे उल्हास खाडीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामाचे सध्या तीनतेरा वाजले आहेत. दुर्गाडी येथील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाला. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्या पुलाला पर्याय म्हणून नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला. तो पूलही आता वाढत्या वाहनांना अपुरा पडू लागल्याने दोन वर्षांपासून या पुलाच्या बाजूला ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून नवीन पूल उभारणीचे काम संथगतीने सुरू  आहे.

शिळफाटा-भिवंडी बाह्य़वळण रस्त्याने येणाऱ्या वाहनांची कोंडी फोडणे या उद्देशातून हा पूल उभारला जात आहे. हा पूल ज्या दुर्गामाता चौकात (दुर्गाडीच्या पायथ्याशी) उतरविण्यात येणार आहे तेथे यापूर्वीच आधारवाडी, गोविंदवाडी आणि शिवाजी चौक भागातून वाहनांचे लोंढे येऊन धडकतात. भिवंडीकडून जाताना कोन गावातील चिंचोळ्या रस्त्यात ही वाहने अडकून पडतात. नवीन पुलाचे पोहोच रस्ते कोन गावातील चिंचोळ्या रस्त्यात आणि कोंडीने गजबजलेल्या दुर्गामाता चौकात उतरविण्यात येणार आहेत. नवीन पूल उभारून कोंडीवर मात करण्याचे प्रयत्न यामुळे फोल ठरू शकतात. काही महिन्यांपासून या पुलाचे काम पूर्णपणे ठप्प आहे.

कल्याणची लोकसंख्या सुमारे सात लाख आहे. कोन गावची लोकसंख्या सुमारे ७० ते ८० हजार आहे. विस्तारित नवीन कल्याण, कोन गावच्या परिसरात असलेल्या नवीन संकुलांची भर त्यात पडत आहे.

भविष्यातील आव्हाने

*  दुर्गाडी पुलाजवळून मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. खाडीवर तीन उड्डाणपूल आहेत. दोन वाहतुकीसाठी खुले आहेत. त्यामुळे खाडीच्या ठिकाणी वाहिन्या आणि वाहनांचे घट्ट जाळे तयार होणार आहे.

* गणपती विसर्जन घाट या पुलांच्या खालीच आहे. सण, उत्सव काळात या मार्गावरून ये-जा करणे अशक्य.

उपाययोजना फसल्या

* कोन गाव ब्रिटिश काळात वसले आहे. गावातील रस्ता चिंचोळा आहे. भिवंडी बाह्य़वळण रस्त्याची वर्दळ वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोन गावातील रस्त्याचे रुंदीकरण केले. त्यातच घरासमोरील एक इंच जमीन रस्ते, गटारांसाठी देण्यास ग्रामस्थ तयार नाहीत. भिवंडीकडून कल्याणच्या दिशेने येताना सकाळ, संध्याकाळ कोन गावातील चिंचोळा रस्ता वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. या कोंडीतून सुटण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तास लागतात.

* जुन्या धोकादायक पुलावरून दुचाकी आणि रिक्षा प्रवास करतात. नवीन पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. ही सर्व वाहने कोन बाजूला चिंचोळ्या रस्त्यावरून मार्गस्थ होतात. कल्याण बाजूला दुर्गामाता चौकात उतरतात. हा चौक कोंडीचे जंक्शन आहे. नवीन दुर्गाडी पुलावरून वाहतूक सुरू झाली तरी त्यामुळे पुलावरील कोंडी कमी होईल. वाहनांचे ये-जा करण्याचे विभाजन होईल. ही वाहने पुलावरून उतरल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने जाण्यासाठीचे नियोजन नाही.

*  दुसरा उड्डाणपूल उन्नत मार्गाने दुर्गाडीला वळसा घालून गोविंदवाडी रस्त्यावर उतरविणे आवश्यक होते. तसे न करता दुर्गामाता चौकात उतरविण्यात आला. या उन्नत मार्गामुळे भिवंडीकडून येणारी वाहने कल्याणमध्ये न येता गोविंदवाडी रस्त्याने बाह्य़ मार्गाने निघून गेली असती. या उन्नत मार्गाला एक पोहोच उतार रस्ता लाल चौकीच्या दिशेने दिला असता तर काही वाहने कल्याण शहरात मार्गस्थ झाली असती.

वाढता भार

मुरबाड रस्ता, बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा- आधारवाडी रस्त्याने येणारी वाहने भिवंडी, नाशिक, मुंबईकडे जाण्यासाठी दुर्गाडी पुलाकडे येतात. शिळफाटा मार्गे येणारी सर्व प्रकारची वाहने, डोंबिवलीतील, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि २७ गाव परिसरांतील वाहने गुजरात, नाशिक परिसरात जाण्यासाठी दुर्गाडी पुलाचा वापर करतात. नवीन उड्डाणपूल झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचे विभाजन होईल. वाहने पुलावरून कोन, दुर्गामाता चौकात एकाच ठिकाणी उतरणार आहेत.

पर्यायी नियोजन

*      कोन गावाच्या उत्तर-दक्षिण दिशेने गावांच्या बाहेरून नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणारे नवीन पोहोच रस्ते बांधणे गरजेचे.

*      शिळफाटा ते भिवंडी बाह्य़वळण रस्ता होणे आवश्यक.

*      कोन ते कचोरे-नंदी पॅलेस (शिळफाटा) हा १२ वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेला रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे.

केवळ नदी, खाडीवर पूल उभारला म्हणून वाहन कोंडीचा प्रश्न सुटत नाही. त्यासाठी आजूबाजूचे पोहोच रस्ते, भुयारी मार्ग यांची पर्यायी व्यवस्था करावी लागते. तसे काही न करता दुर्गाडी परिसरात खाडीवर फक्त उड्डाणपूल उभारण्याचा सपाटा सुरू आहे. हे पूल उभारल्यानंतर पर्यायी पोहोच रस्ते व्यवस्था करण्यात आली नाही. आता नवीन उड्डाणपूल उभारताना यापूर्वीचे जे दोन पूल पोहोच रस्त्याला जोडलेत त्याच रस्त्याला जोडण्यात येणार आहे. म्हणजे कोंडीचे नवीन जंक्शन नियोजनकर्ते करीत आहेत. प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव, धेडगुजरीपणा याचे नवीन उड्डाणपूल उत्तम उदाहरण आहे.

– श्रीनिवास घाणेकर, जागरूक नागरिक मंच कल्याण