News Flash

मच्छीमारांच्या नव्या पिढीची व्यवसायाकडे पाठ

वसई किनारपट्टीतल्या २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे.

नैसर्गिक अडचणी, शासकीय अनास्था यामुळे अन्य व्यवसायांकडे ओढा

गेल्या अनेक वर्षांत नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्यांच्या जाळ्यात अडकलेल्या मासेमारी व्यवसायाकडे वसईतील मच्छीमारांची नवी पिढीही पाठ फिरवत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दरम्यान वसईतील मच्छीमारांच्या समस्या अद्याप न सुटल्याने हे मच्छीमार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

वसई किनारपट्टीतल्या २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. इथल्या मच्छीमारांची लोकसंख्या सुमारे ५० हजार इतकी आहे. इथली सुमारे ४००० कुटुंबं प्रत्यक्ष मासेमारी करतात, तर आणखी २ हजार कुटुंबं मासेमारीशी संबंधित व्यवसायांत आहेत. प्रत्यक्ष मासेमारी, माशांचं वर्गीकरण करणं, मासे सुकवणं, खारवणं व त्यांची विक्री करणं, असं या व्यवसायाचं स्वरूप आहे. या व्यवसायाला पूरक असे बर्फ उत्पादन, वाहतूक, बोटींची देखभाल-दुरुस्ती असे व्यवसाय आहेत. वसईच्या किनारपट्टीवर आता पूर्वीसारखी मासळी मिळत नाही. आजच्या घडीला समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका फेरीसाठी ४० ते ५० हजार खर्च करून जावे लागते. त्यात गेलेल्या बोटीचा खर्च तसेच बोटीवर काम करणाऱ्या खलाशांचा पगार या खर्चाचादेखील समावेश असतो. वर्षांतील १० महिने मासेमारी केली जाते. त्यातील मुख्य सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात जास्त मासळी मिळते. बाकी महिन्यात तुरळक स्वरूपात मासे मिळतात. म्हणजे मोजून सहा महिने मासेमारी करून वर्षभराचा खर्च काढावा लागतो. या सर्वामध्ये कुटुंबाचा खर्च कसा निघणार याची भीती आजच्या मच्छीमारांच्या पिढीला भेडसावत आहे. त्यामुळे आजची पिढी मासेमारी या व्यवसायाकडे पाठ फिरवत चालली असून ते बँकेत, रिगवर अशा प्रकारच्या नोकऱ्यांकडे वळत असल्याचे कोळी युवा शक्तीच्या दिलीप माठक यांनी सांगितले.

रेती उपसामुळे मासेमारीस धोका

वसईच्या खाडीत वर्षांनुवर्षांच्या अर्निबध रेती उपशामुळे किनाऱ्याची दुर्दशा झाली असतानाच आता खाडीमध्ये तांत्रिक पद्धतीने ड्रेझरच्या माध्यमातून रेतीउपसा करण्यास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वसईच्या खाडीत भाईंदर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडे आतापर्यंत झालेल्या अर्निबध रेती उपशामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर किनाऱ्याची अक्षरश: वाताहत झाली आहे. किनारा वाहून गेल्यामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला असून पावसाळ्याच्या काळात बोटी सुरक्षित ठेवण्यासाठीही जागा राहिलेली नाही. पूर्वी ज्या किनाऱ्यावर २०० बोटी सुरक्षितरीत्या राहू शकत होत्या त्या ठिकाणी आता दोन बोटी ठेवण्याइतकाही किनारा राहिलेला नाही. तर किनाऱ्या लगतच्या मच्छीमारांना अनेक घरांनाही समुद्राने व्यापले आहे. बोंबील, कोलंबी, ढोम्बेरी, बोय, करंदी, बांगडे, खेकडे, मुशी, मांगण, शिंगटी, बगा, निवटय़ा ही मच्छी पूर्वी नायगाव, पाचूबंदर  किनाऱ्यापासून काही अंतरावर भरपूर असायची. परंतु झालेल्या रेती उपशामुळे किनारपट्टीवरील माशांची पिल्ले मरून जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:27 am

Web Title: new generation of fishermen leaving fishing business
Next Stories
1 रेल्वेचा पाणीपुरवठा पालिकेकडून खंडित
2 आज ठाण्यात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
3 पार्किंगच्या नावाखाली लूट
Just Now!
X