रेल्वे वसाहतीच्या मोकळ्या भूखंडावर ५०० दुचाकी उभ्या करण्याची सोय

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : घोडबंदरसारख्या लांब अंतरावरून खासगी वाहने घेऊन ठाणे स्थानकापर्यंत येणाऱ्या रेल्वेप्रवाशांना त्यांची वाहने सुरक्षितपणे आणि वाहतुकीला अडथळा न होता उभी करता यावीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडे आणखी एक वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिमेकडील रेल्वे वसाहतीच्या मोकळ्या जागेवर सध्या बेकायदा वाहनतळ चालवण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेल्वेने आता ही जागा आपल्या ताब्यात घेऊन त्यावर अधिकृत वाहनतळ सुरू करायचे ठरवले आहे. या जागेत सुमारे पाचशे दुचाकी एकाच वेळी उभ्या करता येणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकात दिवसाला लाखो प्रवासी ये-जा करत असतात. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने अनेक जण खासगी वाहने घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत असतात. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वेचे दुमजली वाहनतळ आहे. तर, पूर्वेला एक वाहनतळ आहे. ही पार्किंग व्यवस्थाही तोकडी पडत आहे. वर्षभरापूर्वी पश्चिमेला असलेल्या रेल्वे कॉलनीच्या दोन इमारती धोकादायक झाल्याने त्या रेल्वे प्रशासनाने पाडल्या. त्यानंतर येथील जागा मोकळी झाली होती. याचा गैरफायदा घेत काही जणांनी येथे बेकायदा वाहनतळ सुरू केले. या ठिकाणी    वाहने उभी करणाऱ्यांकडून प्रत्येक वाहनामागे २० रुपये शुल्क वसुलीचा उद्योगही गेल्या काही महिन्यांपासून राजरोसपणे सुरू आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती वरिष्ठ स्तरावर पोहचवली. तसेच यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने या भागात आता स्वतचा असा वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या कामाची निविदा प्रक्रियाही रेल्वेने सुरू केली असून १ हजार ८८८.४९ चौरस मीटर इतक्या जागेत हे वाहनतळ उभे केले जाणार आहे. प्रत्येकी तीन महिन्यांसाठी १७ लाख २५ हजार ८४१ रुपयांची ही निविदा आहे. त्यामुळे रेल्वेला यातून दर वर्षी सुमारे ७० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. या वाहनतळात सुमारे पाचशे दुचाकी उभ्या राहू शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

चारचाकींसाठीही सोय?

ठाणे पश्चिमेकडून सर्वात जास्त प्रवासी ये-जा करत असतात. पश्चिमेला दुमजली वाहनतळ आहे. मात्र, या वाहनतळात चारचाकी वाहने उभी राहत नाहीत. त्यामुळे रेल्वे कॉलनी जागेतील हे नवे वाहनतळ उभे राहिल्यास चारचाकी वाहनेही या वाहनतळात उभ्या राहू शकतात असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पार्किंगचे प्रस्तावित दर

तास                 सायकल       दुचाकी        चारचाकी

दोन                 ५  रु.                १० रु.        २० रु.

दोन ते सहा       १० रु.             २० रु.        ४० रु.

सहा ते १२         १५ रु.             ३० रु.        ८० रु.

१२ पेक्षा जास्त  २० रु.             ४० रु.        १०० रु.

मासिक पास      २०० रु.       ४०० रु.       ९०० रु.