नायगाव पूर्वेच्या रहिवाशांना स्थानकाकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेला ब्रिटिशकालीन पूल मोडकळीस आल्याने नवा पूल बांधण्यात येत आहे. मात्र या पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचणी आल्याने या पुलाचे काम रखडले होते. मात्र या अडचणी दूर झाल्या असून एप्रिलपर्यंत हा पूल रहिवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

नायगाव येथे खाडीवर गेल्या अनेक वर्षांपासून जुना लोखंडी पूल असून रेल्वे स्थानकातून वसई पूर्वेकडील गावांमध्ये जाण्यासाठी या पुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र हा लोखंडी पूल गंजलेल्या अवस्थेत असून तो कधीही पडण्याची भीती आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधावा यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने येथे नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला. नायगाव पूर्वेकडील खाडीवर पुलाचे बांधकाम करण्याचा कार्यादेश १० सप्टेंबर २०१४ रोजी देण्यात आला होता. मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. ते पूर्ण होऊ  शकले नाही. त्याचा खर्च ५ कोटी २० लाख रुपये होता. मात्र विविध कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. हा पूल मार्च २०१६ मध्ये पूर्ण होणार होता. त्यानंतर कामाला मुदतवाढ देण्यात आली. दुसरी मुदत डिसेंबर २०१६पर्यंत होती, तर तिसरी मे २०१७ पर्यंत तरीही तो पूर्ण झाला नाही.

मध्यंतरी खाडीतून जलवाहतूक सुरू करायची असल्याने मेरीटाइम बोर्डाने पुलाची उंची सहा मीटर करण्यास सांगितले होते. त्यामुळे नवीन अडचण निर्माण झाली होती. वाढलेल्या उंचीमुळे पुलाचा उतार हा नव्याने तयार होणाऱ्या एमएमआरडीएच्या उड्डाणपुलाच्या मार्गातून जाणार असल्याने या दोन्ही पुलांचे उताराच्या तांत्रिक बाबी तपासून पुलाच्या रचनेत फेरबदल करावे लागणार होते. या नव्या अडचणीमुळे पुलाचे काम रखडले होते. मात्र आता ही अडचण दूर झाली असून या पुलाचे बांधकाम पुन्हा युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आता एप्रिल २०१८ पर्यंत हा पूल बांधून पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जगदाळे यांच्यातर्फे सांगण्यात आले.