News Flash

कोंडीवर उतारा

गडकरी रंगायतनजवळ नव्या वाहनतळाचा प्रस्ताव

गडकरी रंगायतन परिसरात नेहमीच रस्त्यावर पार्किंग केले जाते.

गडकरी रंगायतनजवळ नव्या वाहनतळाचा प्रस्ताव; मासुंदा तलाव, जांभळी नाक्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम

ठाणे : महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागातील वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या गडकरी रंगायतनजवळ वाहनतळ उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावामुळे मासुंदा तलाव, जांभळी नाका, टेंभीनाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शहरात वाहनतळाची सुविधा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अनेकजण रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु या ठिकाणी आधीच अरुंद रस्ते असताना त्यावर बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने गावदेवी मैदानात भूमिगत तर नौपाडा प्रभाग समिती इमारतीच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापाठोपाठ रेल्वे स्थानकापासूनच काही अंतरावर असलेल्या मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन आणि जांभळी नाका भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या परिसरात नवे वाहनतळ उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे.

ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मासुंदा तलावाकाठी अनेकजण फेरफटका मारण्यासाठी येतात. परंतु येथे वाहने उभे करण्यासाठी जागा नसल्याने अनेकजण रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यातच या रस्त्यांवर घोडागाडीची वाहतूक सुरू असते. यामुळे गडकरी रंगायतन चौक, जांभळी नाका या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका टेंभीनाक्यावरील मार्गानाही बसतो. परंतु नवे वाहनतळ उभे राहिल्यास येथील बेकायदा पार्किंगला लगाम बसून येथील कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

प्रस्ताव काय आहे?

गडकरी रंगायतनजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा १९५२.८० चौरस मीटरचा भूखंड आहे. त्यापैकी २९८ चौरस मीटरवर कार्यालय तर ५१० चौरस मीटरवर निवासस्थाने आहेत. हा भूखंड मिळवून त्यावर वाहनतळ उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वीही महापालिकेने असे प्रयत्न केले होते. परंतु कार्यालय आणि निवासस्थाने असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यास नकार दिला होता. त्यामुळे या भूखंडावरील कार्यालय आणि निवासस्थाने इतरत्र स्थलांतर करण्यासाठी समकक्ष बांधीव क्षेत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 3:41 am

Web Title: new parking plaza proposal near gadkari rangaytan zws 70
Next Stories
1 डोंबिवली पूर्व, कल्याण पश्चिमेत रुग्णसंख्येत वाढ
2 पोलिसांना ५६७ सदनिका मोफत
3 डोंबिवलीतील ४९० उद्योजकांना नोटिसा
Just Now!
X