X

दिवा स्थानकात नवीन पादचारी पूल

रेल्वे प्रशासन पथकाच्या भेटीदरम्यान या सर्व बाबी प्रवाशांनी प्रशासनाकडे व्यक्त केल्या

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाच्या पथकातर्फे मंगळवारी दिवा स्थानकात करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्यात कल्याणच्या दिशेला नवा पादचारी पूल बनविण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच दिवा रेल्वे स्थानकात नव्याने प्रवाशांसाठी तिसरा पादचारी पूल मंजूर झाला आहे. रेल्वेचे पाहणी पथक मंगळवारी आले होते. त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या पाच वर्षांत दिवा शहरात मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले. मध्य रेल्वेच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकात दिव्याचा आठवा क्रमांक लागतो. दिव्यातील ८० टक्के नागरिक हे पूर्वेच्या दिशेने राहतात. त्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत रेल्वेच्या पादचारी पुलावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. येथे मुंबईच्या दिशेने एक, तर मध्ये दुसरा पादचारी पूल आहे. मात्र, कल्याणच्या दिशेने पादचारी पूल नसल्याने येथे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होते. अखेर नवीन पुलाच्या बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दिवा स्थानकातील प्रवाशांसाठी आता सरकते जिने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दिवा स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी एकाच पुलाची व्यवस्था आहे. दिव्याची लोकसंख्या पाहता प्रवाशांसाठी हा एकच पूल अरुंद असल्याने गैरसोईचा आहे. २९ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस कोसळत असताना मालगाडी रेल्वे रुळावर बराच वेळ थांबल्याने रूळ ओलांडण्याचा मार्गही बंद झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पुलावर गर्दी केली होती. या वेळी या पुलावरदेखील चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. रेल्वे पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ही गर्दी नियंत्रणात आणल्याने काही दुर्घटना घडली नाही.

रेल्वे प्रशासन पथकाच्या भेटीदरम्यान या सर्व बाबी प्रवाशांनी प्रशासनाकडे व्यक्त केल्या. त्यानंतर कल्याणच्या दिशेने पादचारी पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पथकात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ठाणे महापालिका अधिकारी, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बळ आदींचा समावेश होता. सध्या रेल्वे स्थानकात असलेल्या पुलाला एकाच बाजूला पायऱ्या आहेत. मात्र यावरून ये-जा करताना या पायऱ्यांवर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले असता, या पुलाच्या दोन्ही बाजूंना पायऱ्या बसवण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. नवीन पुलाचे बांधकाम करताना सरकत्या जिन्यांचा प्रस्तावदेखील लवकरच मंजूर केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंह यांनी दिली.

प्रवाशांच्या अन्य मागण्या

* दिवा पूर्वेला उतरणाऱ्या पादचारी पुलाची रुंदी वाढवण्यात यावी.

* फलाट क्रमांक १ आणि २ येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर सरकत्या जिन्याची आवश्यकता आहे.

* कल्याण-मुंबई दिशेकडील पादचारी पूल जोडणारा स्कायवॉक तयार करावा.

* मुंबई दिशेकडील पादचारी पुलावर तिकिटघर सुरू करावे.

* दिवा स्थानकात आवश्यक तिथे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

  • Tags: diva-station,
  • Outbrain