News Flash

बदलापुरात राष्ट्रवादीचे रण

बदलापूर नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने शहरात दररोज नवनव्या राजकीय घटना घडत आहेत.

| February 14, 2015 12:28 pm

बदलापूर नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने शहरात दररोज नवनव्या राजकीय घटना घडत आहेत. संख्याबळ आणि राजकीय हवा यात फक्त सेना-भाजपची आघाडी असून अन्य पक्षांची दयनीय अवस्था झाली आहे. मनसे आणि काँग्रेस पक्षांनी माना टाकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील समस्या घेऊन रस्त्यावर उतरली आहे. महिनाभरात अनेक  मुद्दय़ांवर राष्ट्रवादीने चार आंदोलने केली. नगरपालिका कार्यालयावर मोर्चे काढले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वेळची निवडणूक मारण्याच्या इराद्याने सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवले आहे.  
वाढीव करप्रणाली, शहरातील खराब रस्ते, शिधावाटप कार्यालये, स्वाइन फ्लूचा शहरात गेलेला बळी या प्रश्नांवर मोर्चे काढून राष्ट्रवादीने अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मनसे आणि काँग्रेसच्या आघाडीवर कोणतीही हालचाल होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. त्याऐवजी मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सेना-भाजपसारख्या सत्ताधारी पक्षांमध्ये जाण्याचा सोयीस्कर मार्ग अवलंबला आहे.
नुकताच काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर मनसेच्या महिला कार्यकर्त्यां सेना-भाजपच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये सेना-भाजप यांच्यातच मुख्य लढाई असेल. निवडणुकीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी असेल. त्यामुळे सेना-भाजपमध्ये बंडखोरी झाली तरच राष्ट्रवादीला उमेदवार मिळू शकतील. मात्र काँग्रेसच्या एकमेव नगरसेविकेने पक्ष सोडल्याने पक्षाला उमेदवारच मिळू शकणार नाही.

‘आप’चीही तयारी?
दिल्लीतील यशानंतर आम आदमी पक्षाने  या पालिका निवडणुकांमध्ये ‘आप’ सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून ‘आप’चे महाराष्ट्रातील नेते मयंक गांधी आणि अंजली दमानिया यांची परवानगी मिळाल्यास निवडणुकीत सहभागी होऊ, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 12:28 pm

Web Title: new political incident happening in badlapur ahead of local body poll
Next Stories
1 चित्रसुरांतून जीवन संदेश
2 रस्त्यावरील विद्युत खांबामुळे रहिवाशांना भीतीचा ‘शॉक’
3 तिच्या चालण्याला जिद्दीचे बळ!
Just Now!
X