समाजमाध्यमांवर चित्रफितीद्वारे शाळा प्रवेशाचे आवाहन; सुधारलेल्या दर्जासह उपक्रमांविषयी माहिती

ठाणे : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषदेकडून शाळांमधील सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात घेण्यात येणारे उपक्रम यांची माहिती देणाऱ्या चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. शाळा व्यवस्थापनातर्फे त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत असून पालकांना त्यांच्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या चित्रफितींमुळे ग्रामीण भागातील पालकवर्ग आकर्षित होत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र खासगी शाळांचे प्रमाण वाढले असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहेत.  त्यातच यंदा करोनाचे संकट आल्याने या टाळेबंदीच्या काळात शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या

वाढवायची कशी, हा प्रश्न अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना पडला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाकरिता विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी चित्रफिती तयार केल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारू लागला आहे. जिल्हा परिषदांच्या शाळेत सरकारकडून येणाऱ्या निधीच्या मदतीने वातानुकूलित वर्गखोल्या, डिजीटल वर्गखोल्या, स्मार्ट बोर्ड, वाचनालय, संगणक प्रशिक्षण कक्ष, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत गणवेश, मोफत शैक्षणिक साहित्य, मध्यान्ह भोजन आणि पूरक आहार अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून निरनिराळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधा आणि राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माहितीच्या चित्रफिती प्रत्येक शाळा व्यवस्थापनाकडून तयार करण्यात आल्या आहेत.

तसेच त्यामध्ये विविध

गाण्यांचे ध्वनी मुद्रण करण्यात आले असून या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक या चित्रफितींकडे आकर्षित होऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे शाळा व्यवस्थापन शिक्षण समितीकडून सांगण्यात आले.

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे टाळेबंदीच्या काळातसुद्धा शाळांच्या पटसंख्या वाढविण्यासाठी चित्रफिती बनविण्यात आल्या आहेत. या चित्रफितींच्या माध्यमातून यंदाच्या वर्षीही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के पटसंख्या करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

– संगिता भागवत, जिल्हा शिक्षणाधिकारी, ठाणे.