निसर्ग उद्यान आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन; वनविभाग आणि महापालिकेची योजना
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या पातलीपाडा येथील महापालिकेच्या ४.४२ हेक्टर जागेवर आता निसर्ग उद्यान उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि मुख्य वन संरक्षक विकास गुप्ता यांनी बुधवारी या भागाची संयुक्त पाहणी करून हा निर्णय घेतला. वन विभागाच्या नियमनानुसार या ठिकाणी निसर्ग उद्यान उभारण्यात येणार आहे. या बरोबरच पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या येऊरच्या जंगलामध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्नही महापालिका आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून होणार आहे.
ठाणे शहरालगतचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येऊरचे जंगल म्हणून ओळखले जात असून या भागामध्ये पर्यटकांचा मोठा राबता असतो. या पर्यटकांना जंगलाचे आणि येथील आदिवासी संस्कृतीचे ज्ञान व्हावे याकरिता इथे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा निर्णय महापालिका आणि वनविभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. या संदर्भात गेल्या
आठवडय़ात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मुख्य वन संरक्षक विकास गुप्ता यांनी संयुक्त पाहणी करून या संदर्भात निर्णय घेतले. पातलीपाडा येथील ही जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कक्षेत येत असल्याने त्याचा विकास रखडला होता. या पाहणी दौऱ्यामुळे या उद्यानाचा मार्ग मोकळा झाला असून वन खात्याच्या नियमानुसार प्रसिद्ध वास्तुविशारद आणि भूरचनाकार (लॅण्डस्केप डिझायनर) अरुणकुमार यांच्याकडून निसर्ग उद्यानाचे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. या आराखडय़ांना वन खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर निसर्ग उद्यान उभारण्याची कार्यवाही महापालिका स्वखर्चातून करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना वनविषयक बाबींचे ज्ञान व्हावे, विविध पक्ष्यांची माहिती मिळावी, औषधी वनस्पतींची माहिती व्हावी अशा प्रकारे निसर्ग उद्यानाची रचना करण्यात येणार आहे.

पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचा अनुभव
पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असलेल्या येऊर परिसरातील दुर्लक्षित असलेल्या तलावाचे तीन महिन्यांत पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्या ठिकाणी पर्यटकांना आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेला वन खात्याची परवानगी मिळाली आहे. येथील दुर्लक्षित तलावांचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन करणे, पाण्याचा दर्जा राखण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करणे, तलावाभोवती पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक कट्टा तयार करणे, तलावाभोवती संरक्षक कुंपण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येऊरला भेट देणाऱ्या शेकडो पर्यटकांना आकर्षित करेल अशा पद्धतीने या तलावाच्या भोवती आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा निर्माण करण्यात येणार आहेत. ब्रिटिशकालीन बांधकामांना कोणतीही हानी न पोहोचवता तेथील आदिवासी संस्कृती चितारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुल्लाबाग, टिकुजिनीवाडी रस्त्यासही परवानगी
वनक्षेत्रात येत असल्याने गेली काही वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुल्लाबाग ते घोडबंदर रोड, टिकुजिनीवाडी ते कॉसमॉस हाऊस आणि निसर्ग उद्यानाकडे जाणारा रस्ता बनविण्यासाठी वनखात्याकडून परवानगी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे तीनही रस्ते अस्तित्वात आहेत. परंतु वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने या रस्त्यांचा विकास करता येत नव्हता. परंतु वहिवाट असल्याने या रस्त्यांच्या विकासासाठी हरकत घेण्यात येणार नसल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.