News Flash

तपास चक्र : रिक्षाच्या चाकामुळे बाळाचा शोध

अवघ्या १२ तासांत बाळाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली. बाळाच्या चेहऱ्याकडे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण, अवघ्या काही तासांतच बाळ चोरीला गेल्याने ती कोलमडून पडली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणामध्ये बाळ चोरणारी महिला दिसली खरी, पण ज्या रिक्षातून ती बाळ घेऊन गेली, त्या रिक्षाचा क्रमांक कॅमेऱ्यात काही दिसत नव्हता. अखेर त्या रिक्षाच्या चाकाची चकती तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरले आणि अवघ्या १२ तासांत बाळाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्याच तपासाची ही कथा..

भिवंडी येथील पोलीस वसाहतीजवळील आदिवासी पाडय़ात राहणाऱ्या मोहिनी मोहन भवार (१९) या गर्भवती महिलेला १३ जानेवारी रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्या. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री सव्वादहाच्या सुमारास दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या पाऊण तासात मोहिनी हिने एका मुलाला जन्म दिला. बाळाच्या चेहऱ्याकडे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याच रात्री दोन ते अडीच दरम्यान एक महिला तिच्याजवळ आली आणि ‘तुझ्या आईने बाळ मागितले’ असल्याची बतावणी करून बाळाला घेऊन गेली. काही वेळानंतर तिची आई तिच्याजवळ आली. त्या वेळेस बाळ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेनगर पोलीस रुग्णालयात दाखल झाले. बाळ चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने तात्काळ बाळाचा शोध सुरूकेला. पण त्यांच्या हाती काही धागेदोरे लागत नव्हते. एकीकडे ही पथके बाळाचा शोध घेत असतानाच दुसरीकडे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनीही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.

चोरीला गेलेल्या बाळाच्या शोधासाठी नितीन ठाकरे यांच्या पथकाने रुग्णालय आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर बाळ चोरणाऱ्या टोळींची विविध पोलीस ठाण्यांतून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणामध्ये एक महिला बाळाला रिक्षामधून घेऊन जाताना दिसली. पण त्या रिक्षाचा क्रमांक काही दिसत नव्हता. त्यामुळे पथकाच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. त्याच वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणामध्ये दिसणाऱ्या त्या रिक्षाच्या चाकावरील चकतीकडे पथकाची नजर गेली. ही चकती स्टीलची आणि वेगळीच दिसणारी होती. पोलिसांसाठी ही चकतीच महत्त्वाचा दुवा होती. त्यांनी अशी चकती असलेल्या रिक्षांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तशी रिक्षा सापडताच संबंधित रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करण्यात आली. त्याने या महिलेला ठाणे स्थानकात सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. तेथून पोलिसांच्या तपासाला पुढची दिशा मिळाली.

पोलिसांनी स्थानकाकडे मोर्चा वळविला आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या वेळेस ती महिला सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी ठाण्यापासून ते सीएसटी स्थानकातील सर्वच कॅमेरे तपासले. सीएसएमटी स्थानकामध्ये ती महिला लोकलमधून उतरली नाही. तसेच ही लोकल टिटवाळ्याच्या दिशेने निघाली. त्यामुळे पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी सीएसएमटी ते टिटवाळा या स्थानकादरम्यानचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात ती डोंबिवली स्थानकात उतरल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या स्थानकातून पुन्हा तिच्या घरापर्यंतचा माग काढून पोलिसांनी तिच्या तावडीतून बाळाची सुटका केली. गुडीया सोनू राजभर (३५) या महिलेसह तिचा पती सोनू परशुराम राजभर (४०) आणि विजय कैलास श्रीवास्तव (५५) या तिघांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. राजभर दाम्पत्याच्या घरामध्ये पथकाला आणखी पाच मुले सापडली. त्यात एक मुलगा आणि चार मुली होत्या. ही सर्व मुले स्वत:ची असल्याचा दावा राजभर दाम्पत्याने केल्यामुळे त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा दावा खरा ठरला. तिला आणखी एक मुलगा हवा होता आणि विजयचे कोणीच नातेवाईक नसल्यामुळे त्यांचा म्हातारपणी सांभाळ करण्यासाठी तिने कृत्य केल्याचे तपासात उघड झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:13 am

Web Title: newborn baby boy stolen from civil hospital in thane rescued
Next Stories
1 सोपाऱ्यातील बौद्ध स्तूपात असुविधा
2 गोष्ट एका ‘पॅडवुमनची’
3 ठाणे खाडीकिनारी चीन-जपानचा ‘राखाडी’ पाहुणा
Just Now!
X