समाज माध्यमावरील संभाषणावरून वाद
विरार : वसईच्या वालीव परिसरात एका नवविवाहितेची पतीकडून हत्त्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
वसई पूर्व तुंगारेश्वर येथील नेपाळी चाळीत राहणाऱ्या आले पुरम सहवीर साहू यांची मुलगी अंजू (२०) हिचे याच चाळीत राहणाऱ्या कमल थापा याच्याशी प्रेमाचे तार जुळले होते. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी नकार न देता जानेवारी महिन्यात दोघांचे लग्न लावून दिले. पण ज्याच्या हातात मुलीचा हात दिला त्यानेच मुलीची हत्त्या केल्याचे समोर आले.
अंजू आणि कमल यांचा संसार सुरू होण्याआधी दोघांमध्ये छोटय़ा छोटय़ा कारणावरून वाद विवाद होण्यास सुरुवात झाली. रविवारी एका लग्नाच्या कार्यक्रमातून परत आल्यावर अंजू समाज माध्यमावर कुणाशी तरी बोलत असल्याचे कमलने पाहिले यावरून दोघांत भांडणे झाली. याचा राग मनात ठेऊन सोमवारी रात्री दीडच्या सुमारास अंजू झोपली असताना कमलने गळा दाबून तिची हत्त्या केली.
कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने तिला अर्धनग्न करून घरामागील जंगलात एका झाडाला गळफास लाऊन लटकविले. सकाळी ग्रामस्थांनी अंजूचा अर्धनग्न मृतदेह पहिला असता वालीव पोलिसांना खबर दिली.
पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तपासात कमलची चौकशी केली असता त्याने दिलेली माहिती विसंगत असल्याने पोलिसांनी कसून चौकशी करताच कमलने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 2:35 am