ठाणे शहर आता स्मार्ट सिटी होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवत आहे. शहराचा विकास म्हणजे केवळ ‘दर्शनी’ भागांचा विकास अशी एक संकल्पना शहरात रुळू पाहते की काय असा प्रश्न आम्हा सर्व सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली असून त्यावर तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न महापालिका करताना दिसून येत नाही. गेले कित्येक वर्ष ठाण्यातील जांभळी नाक्यावरील मोहम्मद अली मार्ग ते जवाहर बाग परिसरातील रस्त्याकडे एकाही प्रतिनिधीचे लक्ष गेले नसावे. येथे असलेल्या होलसेल बाजारामुळे सतत हे ठिकाण गर्दीच्या विळख्यात अडकलेले असते. त्यामुळे पायाखालचे खड्डे पाहण्यासाठीही वेळ नसलेली मंडळी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रशासनरयत ही तक्रार पोहचत नाही. जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत कारवाई नाही, असा प्रशासनाचा अलिखित करार आहे. उन्हाळा असल्यामुळे ही समस्या नजरेआड केली जाते. परंतु पावसाळ्यामध्ये हे खड्डे जेव्हा पाण्याने भरतात, तेव्हा वर बघून चालणाऱ्या सर्वच मंडळींना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपण चालत असलेल्या रस्त्यांची खराब अवस्था प्रशासनाच्या निर्दशनास आणून देणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच आलेल्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. आपण आपली कर्तव्य नीट पार पाडावीत जेणे करून शहरात सुव्यवस्था नांदेल.

ठाणे स्थानकातील प्रसाधन गृहाची दुरवस्था
रामचंद्र कर्वे, ठाणे</strong>
ठाणे स्थानकातील एक व दोन नंबर फलाटाच्या जिन्याखाली असलेल्या प्रसाधन गृहाची दुरवस्था झाली आहे. इतक्या महत्त्वाच्या स्थानकात मोक्याच्या जागी असलेले हे प्रसाधन गृह दुरुस्त करावे, असे प्रशासनाला वाटत नाही. या प्रसाधन गृहामधील भांडय़ांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना या प्रसाधन गृहाचा वापरही करता येत नाही. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा प्रसाधन गृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते, तेव्हा ठेकेदार भांडय़ाचे पाइप काढून टाकतो व ते पुन्हा बसवीत नाही. काही महिन्यांपूर्वी फलाट क्रमांक दहाच्या प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असता ती सुमारे दोन महिने बंद होती.याकडे ठाणे स्थानकाच्या प्रबधकांचेही लक्ष नसते. ठेकेदाराला काम करण्यास दिल्यानंतर तो नक्की काय काम करतो, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची नाही का? रेल्वे प्रवासी संघटनाही केवळ रेल्वे गाडय़ांविषयी बोलतात, स्थानकातील समस्यांची कोणाला काही देणे-घेणे नसते.

स्कायवॉकवरील छताचे काम लवकर पूर्ण व्हावे
रेश्मा निनादकर, डोंबिवली.
डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांसाठी डोंबिवली शहरात पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांना स्कायवॉक बांधण्यात आला आहे. या स्कायवॉकवर सध्या छत टाकण्याचे काम सुरूआहे, परंतु हे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा आहे. कारण सध्या उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. उन्हाळ्यात हे काम पूर्ण झाल्यास निदान पावसाळ्यात तरी नागरिकांना पालिकेच्या या चांगल्या सुविधांचा लाभ लवकरात लवकर द्यावा. रस्त्यांच्या कामाप्रमाणेच या कामालाही गती प्राप्त व्हावी. ज्या ठिकाणी फारशी रहदारी नसते, त्या भागापासून पालिकेने छत टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे. मात्र त्याऐवजी रहदारी जास्त असणाऱ्या भागाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

कोपर स्थानकातला प्रवास पादचारी पुलाअभावी धोकादायक
प्रथमेश शिर्के, डोंबिवली
रेल्वे प्रशासन रेल्वे रूळ ओलांडू नका, पादचारी पुलाचा वापर करा अशा सूचना वारंवार करताना दिसते. मात्र जिथे पादचारी पूलच नाही, तिथे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडूनच जावे लागत आहे. कोपर रेल्वे स्थानकातून आज लाखो प्रवाशी दररोज प्रवास करतात. मात्र कोपर रेल्वे स्थानकातही केवळ कल्याण दिशेला पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दिवा दिशेला पादचारी पूलच नसल्याने येथील नागरिक रेल्वे रूळ ओलांडूनच जातात. कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला चाळींचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे असे नागरिक येथे स्वस्तात घर मिळते म्हणून राहाण्यास येतात. पश्चिमेलाही जुन्या डोंबिवलीचा विस्तीर्ण परिसर आहे. या नागरिकांना कोपर रेल्वे स्थानक अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे. मात्र पादचारी पूल नसल्याने त्यांना आपला जीव धोक्यात घालूनच रोज प्रवास करावा लागत आहे.