News Flash

वाचक वार्ताहर : बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा ताप

फेरीवाले आणि भाजीवाले यांच्यामुळे संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळते.

बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पश्चिमेला वाढत असलेले फेरीवाले आणि भाजीवाले यांच्यामुळे संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळते. संध्याकाळी ज्यावेळी मुंबईकडून लोकलमधून प्रवासी बाहेर पडतात, त्यावेळी त्यांना रिक्षात बसवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ सुरू असते. त्याच वेळी भाजीवाले आणि विक्रेतेही थेट रस्ता गाठतात. त्यामुळे रिक्षा, प्रवासी आणि इतर वाहने यांची एकाच वेळी गर्दी होते. त्यामुळे रस्ता पार करताना आणि चालताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वैशाली टॉकिजच्या शेजारच्या रस्त्यावरही तशीच परिस्थिती पहायला मिळते. प्रवासी सोडण्याची जागा, प्रवासी रिक्षात भरण्याची जागा आणि भाजीवाले यामुळे अक्षरश: काही काळ रस्ता बंद होतो. त्यावेळी अनेकदा इतर वाहन चालक आणि रिक्षा चालकांचे खटके उडताना पाहायला मिळतात. त्या रिक्षा थांब्याच्या बाजूलाच एक रुग्णालयही आहे. अनेकदा तिथे रुग्णवाहिका पोहोचण्याच अडथळा निर्माण होतो. या वाहतूक कोंडीवर उत्तर शोधण्याची आता गरज आहे. अधिकृत फेरीवाले, भाजी विक्रेते यांचेही नियमन करण्याची आता गरज आहे. त्यांच्यावर नियंत्रण न ठेवल्यास त्यांची संख्या वाढत जाऊन रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड मोठी कोंडी निर्माण होऊ शकते.
रिक्षा चालकांच्या थांब्यावर आणि संख्येवर विचार होण्याची गरज आहे. पादचारी प्रथम हा विचारच यामुळे कुठेतरी मागे पडताना दिसतो आहे. यावर वाहतूक विभाग आणि नगरपालिकेने लक्ष द्यायला हवे.

नव्या बांधकामांची परवानगी रोखा
प्रतीक शिंदे, बदलापूर
ठाणे जिल्हय़ात सध्या अभूतपूर्व पाणीटंचाई आहे. प्रदूषण, गळती, नव्या योजना राबविण्यात आलेले अपयश आदी कारणे त्यासाठी सांगितली जात असली तरी बेफाम वाढणारी लोकसंख्या हे पाणीटंचाईचे प्रमुख कारण आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत कैकपटींनी वाढली आहे. शहरांचा परिघ वाढण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असून मोठमोठी संकुले नव्याने उभारली जात आहेत. आधीच अस्तित्वात असलेल्या लोकांना उपलब्ध असलेले पाणी अतिशय अपुरे आहे. त्यात नव्याने राहायला येणाऱ्या नागरिकांना संबंधित प्राधिकरणे कुठून पाणी देणार आहेत? त्यामुळे पर्यायी जलस्रोत निर्माण होईपर्यंत ठाणे जिल्हय़ातील शहरी भागात नव्याने बांधकाम परवानगी न देणेच उचित होईल, असे मला वाटते. नव्या इमारतींचे प्रमाण अंबरनाथ, बदलापूर भागांत अधिक आहे. किफायतशीर दरात घरे उपलब्ध असल्याने साहजिकच नव्या घराचा शोध घेणारे या भागास प्राधान्य देत आहेत. मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या लोंढय़ांमुळे भविष्यात या भागातील पाणी समस्या अधिक जटिल होण्याची भीती आहे.

ग्रामीण भागातही पाणी द्या
सुनंदा काळण, डोंबिवली
ग्रामीण भागात महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे, परंतु हे पाणीही अपुरे पडत आहे. टँकर गावात आला, की नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. महिलांची पाण्यासाठी भांडणे होत आहेत. स्वतंत्र टँकर मागविला तर अवाच्या सवा भाडे मागितले जात आहे. पालिकेच्या वतीने ग्रामीण भागात दोन पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यात टँकरने पाणी पुरविले जाते; परंतु या टाक्याही एका तासाच्या आत खाली होतात. धरणातच पाणीसाठा कमी असल्याने सर्वत्रच ही परिस्थिती आहे हे सर्व जनतेला मान्य आहे; परंतु थोडय़ाफार होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे समान वाटप व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे. काही भागांत एक थेंबही पाणी येत नसून तेथील नागरिक मोठे मोठे प्लॅस्टिकचे पिंप रिक्षातून वाहत आहेत. रोजचे हे रिक्षाचे भाडे परवडेनासे झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी द्यावे, हीच आमची कळकळीची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:05 am

Web Title: news by loksatta thane readers 3
Next Stories
1 रुपादेवी पाडा मैदानाचे रुपडे पालटणार
2 शब्दयात्रेतून तरुणाईच्या वाचनछंदाचा प्रवास
3 नववर्षांत दोनदा गुढी पाडवा
Just Now!
X