कल्याण- कल्याण रेल्वे स्थानक परिसर रेल्वे विभाग स्मार्ट सिटीकडे झेपावण्यासाठी प्रयत्न करू लागल्याचे दिसत असले तरी कर्मचारी वर्गाची मानसिकता मात्र पूर्वीसारखीच आहे. त्यांनी न्यायालयाची वास्तू पाडून ती जागा स्वच्छ जरी केली असली तरी त्यांच्या हद्दीत अजून सरबतवाले आपले स्थान चांगलेच बळकट करून आहेत. सॅटिस पुलावर फेरीवाल्यांनी तेथील स्थिती अधिक वाईट केली आहे. त्यांना ना रेल्वे पोलीस हटवत ना महापालिका. रिक्षा, कचरा, धूळ यांच्या प्रदूषणाने परिसर गचाळ झाला आहे. रेल्वेने फलाट क्रमांक ५ व ६ वर स्त्री-पुरुषांसाठी प्रसाधनगृह बांधण्याची अत्यंत आवश्यकता आहे, पण फलाट क्रमांक ४ वर मुंबईच्या दिशेनेही प्रसाधन आणि विश्रांतिगृहाची सोय करण्याची आवश्यकता आहे. बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना सध्याचे प्रसाधनगृह व विश्रांतिगृह अपुरे आहे. तसेच गर्दीत तेथे जाणे वयस्कर प्रवाशांना त्रासाचे होते. रेल्वेचे अधिकारी वर्ग याची दखल घेऊन लवकर पूर्तता करून वयस्कर आणि इतर प्रवाशांची गैरसोय दूर करतील काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांची मनमानी
मनीषा बिवलकर, डोंबिवली
शहरातील स्थानक परिसराबरोबरच मधुबन टॉकीज गल्लीत फेरीवाल्यांची संख्या गेल्या काही महिन्यांत जास्तच वाढली आहे. तसेच दुकानदारांनीही दुकानासमोरील पदपथ तसेच रस्त्यावरील जागा बळकावली आहे. त्यामुळे संध्याकाळी येथे प्रवासी, रिक्षा आणि फेरीवाल्यांचा एकच गजबजाट दिसून येतो.
अनधिकृत बांधकाम पाडण्यास आयुक्तांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या कारवाईचे कौतुक असले तरी डोंबिवलीत ही कारवाई होताच दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे असते. आयुक्तांनी या दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना लगाम घालण्याची वेळ आता आली आहे.
डोंबिवली शहरातील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. तसेच फेरीवाल्यांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुबन टॉकीजची गल्ली ही तर खरेदीसाठी प्रसिद्ध होत आहे. येथे जी नाही ती वस्तू मिळते. अगदी चपलांपासून ते मोबाइलच्या हेडफोनपर्यंत सर्व काही. यामुळे येथे ग्राहकांची सतत रेलचेल असते. व्यवसाय होत असल्याने येथे फेरीवाल्यांचीही संख्या वाढत आहे. शिवाय येथील दुकानदार पदपथांबरोबरच आता रस्त्यावरील जागाही बळकावयाला लागले आहेत. अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त ई. रवींद्रन यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी येथील बांधकामांवर पालिकेने कारवाई करत त्यांचे अनधिकृत शेड पाडले. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा लाकडी बांबूंचे शेड उभारत आपला माल मांडून या दुकानदारांनी पालिकेच्या नाकावर टिच्चून पुन्हा व्यवसाय सुरू केला. वर ‘आधी नोटीस द्या नंतर कारवाई करा’ असा युक्तिवाद पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर केला. फेरीवाल्यांसोबतच आता दुकानदारांचीही दादागिरी वाढत चालली असून हे दुकानदार आयुक्तांचा प्रयत्न कितपत यशस्वी होऊ देतात, हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यात पालिका अधिकारी आणि दुकानदारांचे साटेलोटे असले तरी आयुक्तांनी आता जनतेला न्याय द्यावा असे वाटते.