News Flash

राम मराठे महोत्सवाला पुढील वर्षी कात्री?

ठाणे महापालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राम मराठे संगीत महोत्सवाला एकेकाळी ठाणेकर रसिकांची मोठी गर्दी उसळत असे.

(संग्रहित छायाचित्र)

भाग्यश्री प्रधान

प्रेक्षकांच्या ओहोटीमुळे तीनच दिवस कार्यक्रम ठेवण्याचा विचार

ठाणे महापालिकेमार्फत दरवर्षी मोठा गाजावाजा करत आयोजित करण्यात येणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाकडे गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने दरवर्षी पाच दिवस साजरा होणारा हा महोत्सव पुढील वर्षी तीन दिवसांत आटोपता घेण्यात येणार आहे. यंदा महोत्सवाचे जवळपास सर्वच दिवस कालाकारांना रिकाम्या खुच्र्यासमोरच कला सादर करावी लागली. त्यामुळे पुढील वर्षी आटोपशीर आणि दर्जेदार कार्यक्रम करण्याचा विचार पालिका अधिकारी आणि नाटय़ परिषदेचे पदाधिकारी करत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

ठाणे महापालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राम मराठे संगीत महोत्सवाला एकेकाळी ठाणेकर रसिकांची मोठी गर्दी उसळत असे. तिकीट खिडकीवर रांगा लागत.  माजी महापौर अशोक वैती यांनी पंडित राम मराठे महोत्सव ठाणेकरांना मोफत पाहता यावा यासाठी प्रस्ताव मांडला आणि तो मंजूरही झाला. आता रसिकांनी महोत्सावाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसू लागले आहे.

समारोपाच्या दिवशी पंडित उल्हास कशाळकर आणि संज्ञा नाईकमुळे यांना पंडित राम मराठे पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी प्रसिद्ध आणि गुणी कलाकरांची सांगड घालून हा कार्यक्रम सुरू ठेवावा, असे मत पंडित उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केले. नवीन पिढीही वेगवेगळे प्रयोग करत असून काल, आज आणि उद्याची सांगड या कार्यक्रमात घातली तर या कार्यक्रमाचा दर्जा उंचावेल आणि प्रतिसादही वाढेल, असेही ते म्हणाले. विनामूल्य कार्यक्रमांची किंमत उरत नाही त्यामुळे प्रेक्षक नसल्याचे मत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. त्यामुळे पुढील वर्षी तिकिटासाठी काही तरी रक्कम आकारली जावी, असा प्रस्तावही म्हस्के यांनी मांडला.

सुट्टीचे दिवस महत्त्वाचे

पुढील वर्षी हा कार्यक्रम शुक्रवार ते रविवार ठेवण्याचा विचार असल्याचे ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे कार्यवाह नरेंद्र बेडेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पुढील वर्षी महोत्सव पाचऐवजी तीन दिवस आयोजित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे, यासंबंधीचे नेमके धोरण पदाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करूनच ठरेल, असेही माळवी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 2:12 am

Web Title: next year the cut of the ram marathe festival
Next Stories
1 ठाण्यातील बाजारांत नाताळचा उत्साह
2 फुगे, चिरोटे, उंबरे आणि शिंगोळय़ा!
3 कचरा वर्गीकरण न केल्यास दंड
Just Now!
X