22 October 2020

News Flash

निमित्त : लोकहक्कासाठी लढणारी चळवळ

१ नोव्हेंबर १९९२ रोजी वसईत ‘निर्भय जनमंच’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

काही राजकीय पक्ष, प्रशासन किंवा काही खासगी संस्था, व्यक्तींकडून नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली केली जाते. नागरिकांचे हक्क हिरावून घेणाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आणि जनतेला त्यांच्याविरोधातील अन्यायांविरोधात वाचा फोडण्यासाठी १ नोव्हेंबर १९९२ रोजी वसईत ‘निर्भय जनमंच’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

निर्भय जनमंच

वसई तालुक्यात २५ वर्षांपूर्वी काही गुंडांची दहशत होती. त्याचा त्रास सामान्य जनतेला व्हायचा. लोक गुंडांच्या दहशतीमुळे भयभीत झाले होते. या दहशतीविरोधात कोकण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक उल्हास जोशी यांची नंदाखाल येथे प्रचंड मोठी सभा १ नोव्हेंबर १९९२ रोजी झाली. फादर मायकल जी., फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निखिल वागळे, चंद्रशेखर प्रभू आदी मान्यवर या सभेला उपस्थित होते. ती सभा खूप मोठी झाली. सर्व वक्त्यांची प्रभावी भाषणे झाली. उल्हास जोशींचे भाषण तर लोकांना निर्भयतेचा संदेश देणारे झाले. ‘लोक एकत्र आले तर गुंड, माफियांना भय वाटेल, पोलीस मदतीला असतील,’ असे जोशी या वेळी म्हणाले. त्यामुळे कायम भयाच्या आवरणाखाली असलेले लोक एकदम धीट, निर्भय बनले आणि काही होतकरू व्यक्तींनी ‘निर्भय जनमंच’ची स्थापना केली. फादर मायकल जी. त्या काळात नंदाखाल चर्चमध्ये होते. निर्भयाच्या पायाभरणीत त्यांचा मोठा वाटा होता, तर संस्थापक मनवेल तुस्कानो यांच्या प्रेरणेने या संस्थेने अनेक उपक्रम राबवले. नुकतीच या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली.

त्याकाळी टँकरमाफियांद्वारे वसईतील विहिरींमधील पाणी उपसले जात असे. हे बेकायदा असून अशा प्रकारे भरमसाट पाणी उपसले तर भविष्यात विहिरी असुरक्षित होतील हे ध्यानात घेऊन या संस्थेने पाणीउपशाविरोधात वसईत सर्वप्रथम मोर्चा काढला. वीजमंडळाविरुद्ध देखील संघर्ष सुरू होता. यामध्ये एलायस रॉड्रिग्ज, पारधी मास्तर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी लढा दिला होता.

गुन्हेगारी विरोधात लढाई 

वसईतील गुन्हेगारी विरोधात निर्भयने अनेक आंदोलने केली. पत्रकार जितेंद्र किर, प्रकाश मुळे, पॉल डिमेलो अशा वसईत अनेक निष्पाप नागरिकांच्या हत्या झाल्या. अशा अनेक हत्यांच्या चौकशीची गुन्हेगारीवर कारवाई करण्याची मागणी निर्भयने लावून धरली. पोलीस बळ वाढवण्याच्या मागणीसाठी मुंबईत विधानसभेवर २ नोव्हेंबर १९९४ रोजी वसईकरांनी मोठा मोर्चा काढला होता. त्यात खैरनार, बापू काळदाते, डॉमनिक घोन्साल्विस, विलास विचारे आदी सहभागी झाले होते.

संघर्ष रस्त्यांसाठी

वसईत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. या सर्वच रस्त्याच्या नूतनीकरणासाठी डिसेंबर १९९९ मध्ये एकाच वेळी सात ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनाला ठिकठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि बांधकाम विभाग कामाला लागले. कोकण मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. नेरकर यांनी स्वत: वसईत रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांच्या अर्नाळा-वसई रस्त्याच्या नूतनीकरणासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव तयार झाला आणि अन्य १६ महत्त्वाच्या रस्त्यांचे काम त्यांनी प्रस्तावित केले.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संस्थेने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. मृणाल गोरे, उल्का महाजन, पुष्पा भावे आदी मान्यवर महिलांना बोलावून त्यांच्यामार्फत वसईत विविध ठिकाणी महिलांचे प्रबोधन केले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

आराखडय़ाविरोधात आंदोलन

सध्या महापालिकेची लढाई निर्भय मुंबई उच्च न्यायालयात लढत आहेत. डीसी रूलचे एक प्रकरण उद्भवले आहे. एमएमआरडीए आराखडय़ाचे संकट समोर आहे. सीआरझेडआरपी नावाचे नवीन प्रकरण सुरू झाले आहे. या विरोधात निर्भयने हरकती नोंदवल्या आहेत. राज्यभरातील चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणून एक नवे व्यासपीठ उभे केले आहे.

‘चांगल्या, प्रामाणिक कार्यकर्त्यांचा संच उभा राहिला आहे. मुंबईतील मान्यवरांचे पाठबळ, वसईतील हितचिंतकांचे सहकार्य यामुळे निर्भय चळवळ पुढे चालत राहिली. २५ वर्षांचा कालखंड मोठा आहे. एक चळवळ इतकी वर्षे टिकली आहे, त्याचे श्रेय शेकडो कार्यकर्त्यांचे आहे. निर्भयाच्या वाटचालीस अनेक हितचिंतकांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले आहे,’ असे मनवेल तुस्कानो यांनी सांगितले.

‘हरित वसई’साठी योगदान

हरित वसईच्या स्थापनेत निर्भयचे मोठे योगदान होते. संपूर्ण समाजवादी जनता परिवार या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे होता. पर्यावरण सुरक्षा समितीच्या नावाने पर्यावरणाची लढाई ९ ऑगस्ट १९९० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जिंकत न्यायाधीशानी आराखडय़ास स्थगिती दिली आणि आराखडा मोडीत काढला. १९९२ला सिडकोने नवा आराखडा प्रसिद्ध केला. त्या वेळी पंढरीनाथ चौधरी, वर्टीसर, तारामाई वर्तक यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय ‘सिडको हटाव संघर्ष समिती’ स्थापन केली. तत्कालीन नगरविकासमंत्री अरुण गुजराथी आणि मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन वसईतून सिडको काढून नगररचना कायद्याच्या कलम ४० प्रमाणे जनतेचा सहभाग असलेले प्राधिकरण लागू करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यासाठी वसईत कधी नव्हे तो एकमताचा ठराव मंजूर झाला. ही समिती उभी करण्यात निर्भयाचा महत्त्वाचा वाटा होता. यासाठी सर्वाशी समन्वय साधावा लागला, पण त्यांना लोकांची साथ मिळाली नाही. पुढे १९९५, १९९८, २००० असे आराखडे सिडकोने वसईच्या भूमिपुत्रांच्या माथ्यावर मारले. या प्रत्येक आराखडय़ाविरोधी निर्भयाने मोठी आंदोलने केली. १९९८च्या आराखडय़ात वसईच्या किनाऱ्यावर मौजमजेसाठी ९२९ हेक्टर जमिनीवर ‘टुरिझम झोन’ केला होता. कामण, पोमण भागांत ५२७ हेक्टर जमिनीवर कॅटल झोन म्हणजेच तबेला झोन केला होता. मुंबईच्या तबेल्यातून ६० हजार म्हशी वसईत ढकलायची योजना होती. पश्चिम पट्टय़ात भरवस्त्यांतून १०० फूट रस्ते दाखवले होते. हे सर्व लबाडीचे आराखडे उधळून लावण्यासाठी कळंब, जूचंद्र, कामण, नवापूर, अर्नाळा अशा सर्वच भागांतील सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेऊन सिडको कार्यालयावर निर्भय मंचने मोठा मोर्चा काढला होता.

वैष्णवी राऊत Shailaja486@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 3:11 am

Web Title: ngo nirbhay janmanch in vasai
Next Stories
1 पोलीस ठाण्यातील अभ्यागतांची डिजिटल नोंद
2 भाजप आमदाराकडून वीज कर्मचाऱ्यांचे अपहरण?
3 उल्हास नदी विषारी!
Just Now!
X