परहित सेवा संघ

सर्वसामान्यांचे हित कशात आहे, त्यांच्या गरजा काय आहेत हे लक्षात घेऊन त्यासाठी धडपडणारी संस्था म्हणजे परहित सेवा संघ. संस्थेच्या नावातच त्याचा उद्देश स्पष्ट होत आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकातही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेले व्यवसायी एकत्र आले आणि त्यांनी परहित सेवा संघाची स्थापना केली. स्मशानभूमीची देखभाल, गोरगरिबांसाठी अन्नछत्र, आरोग्य शिबीर, वरिष्ठ पत्रकार आणि सेवाभावी संस्थांचा गौरव, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक समाजोपयोगी कार्यात परहितचा सहभाग आहे.

मात्र संस्थेची स्थापना एका वेगळ्याच उद्देशाने झाली. रामायण आणि महाभारत हे आपले धार्मिक ग्रंथ. यातील रामायणातील कथा ठिकठिकाणी रामलीलाच्या माध्यमातून मोठय़ा रंजकतेने सादर केल्या जात असतात. सुरुवातीच्या काळात मीरा-भाईंदरमध्ये रामलीलाचे मोठय़ा स्तरावर आयोजन केले जात नव्हते. काही कलाकार अगदी छोटय़ा स्तरावर रामलीलाचे प्रयोग करत होते, परंतु यासाठी मोठे व्यासपीठ केवळ मुंबई शहर आणि उपनगरात मालाड येथेच उपलब्ध होते. रामलीला ही व्यापक स्तरावर आयोजित करायची, असा निर्णय काही मंडळींनी घेतला आणि २००१ मध्ये परहित सेवा संघाची स्थापना झाली.

दरवर्षी संघाकडून रामलीलाचे आयोजन करण्यात येत असते. अगदी थेट मथुरा येथील रामानुज रामलीला केंद्रातील कलावंत ही रामलीला सादर करायला येतात. वृंदावनातले ६० कलाकार, वादक, भव्य रंगमंच, आकर्षक वेशभूषा अशा पद्धतीने ही रामलीला अतिशय रंजक पद्धतीने सादर केली जाते. रामलीला पाहण्यासाठी अनेक ठिकाणचे लोक मीरा-भाईंदरमध्ये येत असतात. लोकांची सांस्कृतिक भूक भागविल्यानंतर त्यांच्या गरजांवरही परहितने लक्ष केंद्रित केले.

त्या वेळी मीरा-भाईंदर शहरातील अनेक स्मशानभूमींची अवस्था देखभालीअभावी दयनीय झाली होती. भाईंदर पूर्वच्या बंदरवाडी भागातील स्मशानभूमीची अवस्था याहून वेगळी नव्हती. पाणी, वीज, बसण्यासाठी आसन व्यवस्था अशा अनेक पातळींवर या स्मशानभूमीची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे स्मशानभूमीचा कायापालट हे पहिले समाजकार्य संस्थेने हाती घेतले. नगर परिषदेच्या काळात बंदरवाडी स्मशानभूमी परहित सेवा संघाच्या हाती सोपवण्यात आली. संस्थेने या स्मशानभूमीचे रूपच पालटले. उजाड, बकाल अशा स्मशानभूमीचे रूपांतर हिरव्यागार उद्यानात केले. सुरुवातीच्या काळात स्मशानभूमीतील लाकडांसाठी सर्वानाच पैसे मोजावे लागत होते. अशा वेळी गरिबांना मोफत लाकडे देण्याचे काम परहित करत होते. आताही गरजूंना अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य संस्थेकडून ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिले जाते. अनेकवेळा पोलिसांकडून बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत येत असतात. अशा वेळी संस्था विनामूल्य साहित्य उपलब्ध करून देते.

स्मशानभूमीच्या आवारातच भूतनाथ महादेव मंदिर संस्थेच्या वतीने बांधण्यात आले आहे. या मंदिरात एरवीदेखील भक्तांचा सातत्याने राबता असतो. समाजातील अन्यायाला, सामान्यांच्या समस्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा

फोडली जात असते. त्यामुळेच पत्रकारिता हीदेखील समाजसेवा आहे असे मानून निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्यांना संस्थेकडून दरवर्षी गौरविले जाते.

शैक्षणिक जबाबदारी

आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कुटुबांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचे कार्यदेखील संस्था करत आहे. गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क संस्थेकडून देण्यात येत असते. किमान १००० रुपये याप्रमाणे ही मदत विद्यार्थ्यांना देण्यात येते.

प्रकाश लिमये prakashlimaye6@gmail.com