इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणे, पॅकिंग, शिवणकाम व्यवसायांसंदर्भात स्वयंसेवी संस्थांकडून मार्गदर्शन

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीत देहविक्री व्यावसाय बंद असल्याने गुजराण कशी करायची, असा प्रश्न भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना दोन महिन्यांपासून सतावत होता. मात्र एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने त्यांची ही समस्या सुटली आहे. या संस्थेने या महिलांना आता त्यांच्या घरातच इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणे, विविध विक्रीच्या वस्तूंची पॅकिंग करणे आणि शिवणकाम करणे अशी विविध स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे करोना काळात या महिलांना अर्थार्जनाचा पर्याय सापडला आहे.

भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात ४०० ते ४५० महिला देहविक्रीचा व्यवसाय करतात. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या महिलांनी हा व्यावसाय बंद केला. व्यवसाय बंद असल्याने या महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली होती. त्यामुळे भिवंडीतील श्री साई सेवा संस्था यांनी पुढाकार घेत इतर काही संस्थांच्या मदतीने या महिलांसाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिले होते. मोफत अन्नधान्य देण्यापेक्षा आमच्या हाताला दोन पैसे मिळतील असे काही तरी काम द्या, अशी मागणी या महिलांनी या संस्थेच्या डॉ. स्वाती सिंग (खान) यांच्याकडे केली. या महिलांनी स्वत:हून काम करण्याची तयारी दाखवल्याने स्वाती यांनी विविध खासगी कंपन्या आणि संस्थांशी संपर्क साधून प्रयत्न सुरू केले. विक्रीच्या विविध वस्तूंची पॅकिंग तसेच दिवाळीसाठी लागणारे विद्युत दिवे, विद्युत माळा बनविण्याचे काम करणाऱ्या काही कंपन्यांकडून या महिलांना काम मिळाले आहे. सध्या ६० महिला ही कामे करण्यासाठी स्वाती यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रक्षिणाचे या महिलांना दिवसाकाठी १५० ते २५० रुपये मिळतात. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यापेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे.

योग आणि समुपदेशन

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आजूबाजूला प्रचंड नकारात्मक वातावरण आहे. त्यांनी या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडावे यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंतचे काम संपल्यावर त्यांना एक तासभर योगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच त्यांचे आरोग्य नीट राहावे, यासाठी हळदीचे दूध आणि उकडलेली अंडी देण्यात येतात. तसेच नकारात्मक वातावरणात त्यांचे मनाचे स्वास्थ्य राखण्यासाठी त्यांना वेळोवेळी समुपदेशन केले जाते, अशी माहिती डॉ. स्वाती यांनी दिली.

टाळेबंदीच्या काळात लेखन-वाचनाचे वर्ग

टाळेबंदीच्या काळात व्यवसाय बंद असल्याने हाताचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे रिकाम्या वेळात त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवण्याची संकल्पना डॉ. स्वाती यांना सुचली. त्यामुळे देहविक्री करणाऱ्या महिलांपैकीच शाळा शिकलेल्या एका महिलेचा शोध घेण्यात आला. सध्या ही महिला हनुमान टेकडी परिसरातील १० ते १५ पंधरा महिलांना लिहायला आणि वाचायला शिकवत आहे.