भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर विवाहासाठी नाव नोंदणी करणाऱ्या तरुणींची फसवणूक करणाऱ्या अमादी क्लेनमेन्ट नावाच्या व्यक्तीस ठाण्याच्या सायबर विभागाने बुधवारी अटक केली. हा नायजेरियन आरोपी दिनेश चेवण नावाने भारतात वास्तव्य करत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्याने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका तरुणीशी मॅट्रीमोनी डॉट कॉम वेबसाईटवरुन संपर्क साधला. त्यानंतर लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने त्याने या तरुणीकडून तब्बल एक लाख ५७ हजार रुपये उकळले.

याप्रकरणी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा सायबर सेल गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सायबर सेलने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, पाच मोबाईल फोन, एक मोडेम, एटीएम कार्ड, दक्षिण आफ्रिका देशाचे दोन पासपोर्ट आणि ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.