गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पुरवण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

ठाणे येथील तीन हात नाक्यावर भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी सिग्नल शाळा सुरू करून त्यांच्यासाठी उज्ज्वल भवितव्याची दारे खुली करणाऱ्या ठाणे महापालिकेने आता अशाच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी रात्र महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागते. अशा विद्यार्थ्यांना नोकरीसोबतच शिक्षणही पूर्ण करता यावे, या उद्देशातून महापालिकेने किसननगर येथे रात्र महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम व्यवस्थितपणे राबवता यावा, याकरिता एका खासगी संस्थेची मदत घेतली जाणार असून याबाबतचा प्रस्ताव येत्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे.

बुद्धिमत्ता असूनही कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण सोडून नोकरी शोधावी लागते. आपले काम सांभाळून शिक्षण घेण्याचीही त्यांची तयारी असते. मात्र, दिवसाच्या महाविद्यालयांत शिक्षण घेणे शक्य नसते. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने रात्र महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी महापालिकेकडे पुरेसे शिक्षक नाहीत. महाविद्यालय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च करणेही पालिकेला शक्य नाही. तसेच रात्र महाविद्यालय चालविण्याचा पुरेसा अनुभवही पालिकेकडे नाही. त्यामुळे महापालिकेने खासगी शैक्षणिक संस्थेची मदत घेऊन संयुक्तपणे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व शाळा  रात्र महाविद्यालयासाठी  उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात किसननगर येथील माध्यमिक शाळा क्रमांक १ मधील सहा वर्ग खोल्या सायंकाळी ६ ते १० या वेळेत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दहा वर्षे प्रायोगिक तत्त्वावर

कला आणि वाणिज्य शाखेचे रात्र महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून ते खासगी नोंदणीकृत संस्थांना दहा वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. या महाविद्यालयामध्ये महापालिकेसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३० टक्के विद्यार्थी महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील आणि उर्वरित २० टक्के विद्यार्थी महापालिका क्षेत्रामधील आर्थिक दुर्बल घटकांतील असणार आहेत. उर्वरित ५० टक्के विद्यार्थ्यांकडून मात्र संस्था शुल्क आकारून महाविद्यालयाच्या व्यवस्थापन आणि देखभालीचा खर्च भागविणार आहेत. तसेच महाविद्यालयात ग्रंथालय, इंटरनेट अशा सुविधा संस्थेने पुरविल्यास त्यांच्याकडून जागा वापराबाबत कोणत्याही प्रकारचे भाडे घेण्यात येणार नाही, असे महापालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.

२०० वर्गखोल्या डिजिटल

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ‘डिजिटल’ शिक्षण घेता यावे आणि महापालिका शाळांच्या श्रेणीचा दर्जाही वाढावा, या उद्देशातून महापालिकेने आता शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पहिली ते दहावीपर्यंतच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळेतील दोनशे वर्गखोल्या डिजिटल करण्यात येणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे.