News Flash

येऊर वनक्षेत्रात ‘रात्रीस खेळ बंद’

प्रखर प्रकाशझोतात होणाऱ्या क्रीडा सामन्यांना मनाई

प्रखर प्रकाशझोतात होणाऱ्या क्रीडा सामन्यांना मनाई

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर गावातील पाटोणपाडा परिसरात असणाऱ्या टर्फमध्ये रात्रीच्या वेळेस तीव्र प्रकाश झोतात आणि ध्वनिक्षेपकाच्या मोठय़ा आवाजात आयोजित केले जाणारे खेळ तातडीने बंद करण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांकडून संबंधित टर्फ चालकांना देण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या अधिवासात बाधा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येऊरमधील ३ टर्फ आणि क्रिकेट क्लब चालकांना येऊर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून याविषयीच्या नोटीसा धाडण्यात आल्या आहेत.

येऊर गावातील टर्फवर गेल्या काही वर्षांपासून तीव्र प्रकाशझोतात क्रिकेट तसेच फुटबॉलचे सामने/स्पर्धा आयोजित करण्यात येतात. रात्रभर चालणाऱ्या या सामन्यांसाठी प्रकाशझोत आणि ध्वनिक्षेपकांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे याचा स्थानिक ग्रामस्थांना मोठा त्रास होत होता. तसेच येथील गोंगाटाचा वन्यजीवांच्या वावरण्यावरही परिणाम होऊ लागला होता. याबाबत येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटीने वनविभागाकडे तक्रार केली होती.

येऊर गाव शांतता क्षेत्रात येत असून या ठिकाणी रात्री १० वाजल्यानंतर जमाव करून ध्वनिप्रदूषण करणे निषिद्ध असले, तरीही शासनाच्या या नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने रात्रीच्या वेळी आयोजित केले जाणारे खेळ तातडीने बंद करण्याचे आदेश येऊर वनप्रशासनाकडून येऊर गावातील टर्फ चालकांना देण्यात आले आहेत. येऊर येथील द पिच, गुरुकुल क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि आणखी एका टर्फ चालकाला या बंदच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

गावकऱ्यांच्या तसेच पर्यावरणवादी संस्थांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधितांना रात्रीच्या वेळेस आयोजित केले जाणारे हे खेळ तातडीने बंद करण्याविषयीची नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नोटिसांचे पालन झाले नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

– राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी

दीड वर्षांपासून येऊर गावातील टर्फमध्ये रात्रीच्या वेळेस सुरू असणाऱ्या खेळांमुळे स्थानिक नागरिकांसह वन्यप्राण्यांचेदेखील आयुष्य धोक्यात आले आहे. सातत्याने याविषयी तक्रारी येत आहेत. दरम्यान टर्फचालकांचा आततायीपणा वाढल्यामुळे येऊर वनपरिक्षेत्राकडे पुन्हा तक्रार करण्यात आली. कायेदशीर सल्लागारांची मदत घेऊन ही तक्रार करण्यात आली. यापुढे अनधिकृत हॉटेल आणि रेस्टॉरंटवरही अशाच प्रकारच्या कारवाईचे स्पष्ट संकेत वनविभागाच्या या नोटीसमुळे दिसत असल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धंदे दणाणणार आहेत.

– रोहित जोशी, संस्थापक- येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:50 am

Web Title: night game closed in yeoor forest area zws 70
Next Stories
1 ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी शेवटची तालीम
2 रिक्षाचालकांच्या मनमानीबाबत संताप
3 वसईत नाताळ गोठय़ांची जोरदार तयारी
Just Now!
X