भाईंदर : मीरा रोडमधील काशिमीरा परिसरातील रात्र निवारा केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.

मीरा-भाईंदर पालिकेच्या वतीने काशिगाव येथील सिल्वर सरिता परिसरात २०१७ रोजी बेघरांसाठी रात्र निवारा केंद्र, वाचनालय आणि बाजाराची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र कचरा पसरला असून सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय या ठिकाणी मद्यपींचा वावरही वाढला आहे.

पालिकेकडून कोटय़वधी रुपये खर्चून  इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, तीनच वर्षांत ही इमारत मोडकळीस आल्याच्या स्थितीत आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. शौचालयाची टाकीही गेले तीन महिने ओसंडून  वाहत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.  त्यामुळे डासांचेही प्रमाण वाढले आहे. सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत.

रात्र निवारा केंद्राचे संचालन ‘उषा लोटिकर चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या वतीने केले जाते. मात्र, पालिकेने इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे.