बदलत्या जीवनशैलीने सर्वसामान्यांपासून धनाढय़ांपर्यंत प्रत्येकाचे जीवन धावपळीचे करून टाकले आहे. सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडलेला जीव संध्याकाळी ‘सातच्या आत घरात’ पोहोचेलच, याची शाश्वती नसते. कधी कामातील उशीर, तर कधी गाडय़ांचा गोंधळ यामुळे घर गाठण्यासाठी नऊ-दहा वाजलेले असतात. अगदी रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत रेल्वेचे ‘धडाकधुडूक’ सुरूच असते. त्यामुळे या ‘जीवनवाहिनी’सोबत धावणारे मुंबई शहर रात्रभर जागे असते. या जागतेपणाला आता ‘रात्रजीवन’ अशी चकचकीत संज्ञा लाभली आहे आणि त्या जोडीला त्याचे ‘ग्लॅमर’ही वाढत चालले आहे.
मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातही सूर्य अस्ताला गेल्यानंतर एक नवी दुनिया उगवते. दिवसाउजेडी दिसणाऱ्या, अनुभवास येणाऱ्या जगापेक्षा हे जग फार वेगळे आहे. बंद होण्याची कायदेशीर वेळ उलटून गेल्यावरही अनेक हॉटेल्स आणि धाबे सर्रास सुरू असतात, हे उघड गुपित आहे. गरज म्हणून अथवा चैन म्हणून रात्री-अपरात्री अशा ठिकाणी रेंगाळणारे अनेकजण आढळतात. मिणमिणत्या दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघालेली ही खानपान सेवा न परवडणाऱ्या रस्त्यावरील गाडय़ांभोवती गर्दी करून आपली क्षुधाशमवतात. आमलेट पाव, बुर्जी पाव, पावभाजी असे अनेक पर्याय रात्री उपलब्ध असतात. रात्री दीड-दोननंतर कल्याणच्या घाऊक भाजी मंडईला जाग येऊ लागते. भारतातील एक प्रमुख जंक्शन स्थानक अशी ख्याती असणाऱ्या कल्याणच्या फलाटावर रात्रभर वर्दळ असते. रात्री बारा-साडेबारापर्यंत मुंबईहून बाहेरगावी गाडय़ा जात असतात आणि सकाळी दोन-अडीचपासून मुंबईला येणाऱ्या गाडय़ांचा राबता सुरू होतो. मुख्य रस्त्यांवरील दुकाने, बँका तसेच एटीएम सेंटर्सबाहेरील सुरक्षारक्षक एकमेकांच्या साथीने रात्र जागून काढताना दिसतात. कॉल सेंटर्स तसेच आय.टी. क्षेत्रात रात्री उशिरा अथवा पहाटेपर्यंत काम करणारे होम ड्रॉपदरम्यान वाटेत चहा-नाश्त्याचा ब्रेक घेतात. दुप्पट भाडे मिळते म्हणून अनेक रिक्षाचालक रात्री अकरा ते पहाटे तीनपर्यंत स्टँडवर असतात.
रात्रजीवनाची ही लगबग अगदी उघडपणे दिसत नाही. त्यासाठी एक नव्हे तर अनेक रात्री भटकून काढाव्या लागतात. ‘ठाणे लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी अशीच रात्र जागून मांडलेली ठाण्याच्या रात्रजीवनाच्या या दृश्यकथा..

‘रात्रीचे ठाणे’ हवे की नको?
रात्रपाळीत रिक्षा चालविताना भूक लागते. झोप घालविण्यासाठी चहा, सिगारेट लागते, अशा वेळी आमची अवस्था खूपच बिकट असते. त्यासाठी तरी ठाण्यात काही विशिष्ट ठिकाणी खाण्याचे पदार्थ उपलब्ध असणारी दुकाने असावीत. जेथे जाऊन आम्हाला आमची भूक भागवता येईल.
– महेश चौहान, रिक्षाचालक
’’’
आपल्या संस्कृतीत तरी मुलींनी रात्री-अपरात्री घराबाहेर फिरणं तितकंसं योग्य मानलं जातं नाही. मात्र आजकाल मुलींना शिक्षणासाठी मोठय़ा शहरात एकटय़ाने राहावं लागतं. नोकरीच्या निमित्ताने रात्रपाळी करावी लागते. तेव्हा ‘नाइट लाइफ’ ठीक आहे. परंतु मुलींना पूर्ण सुरक्षा असेल तरच त्याला अर्थ आहे.
– वैभवी राजदेरकर,
इंजिनीयर, डोंबिवली
’’’
शहरात सर्वात आधी पहाटे उठून आम्ही वृत्तपत्र व्यावसायिक कामाला लागतो. घरातून अर्धा तास आधी निघावे लागते. तेव्हा भल्या पहाटे काही तरी खायला मिळायला हवे. काही खायचे म्हटले तर ठाणे स्थानक परिसरात आम्हाला पायपीट करून यावे लागते. त्यामुळे ठाण्यात ‘नाइट लाइफ’ असावी.
– दीपक सागवेकर,
वृत्तपत्र व्यावसायिक, ठाणे  
’’’
मुंबईत काम करून रात्री ठाण्यात घरी पोहोचण्यास उशीर होतो, अशा वेळी बाहेर काही खायचं म्हटलं तर वडापावची गाडी अथवा चहाच्या टपरीवर मुली थांबू शकत नाहीत. कुटुंबासाठी, तरुणाईसाठी, रिक्षाचालकांसाठी प्रशासनाने विशेष क्षेत्र (झोन) बनवावे. जेथे उगाच इतरांची भाऊगर्दी नको, तरच आम्हा मुलींना सुरक्षित असल्याचे वाटू शकते. ठाणे शहरापासून दूर घोडबंदर भागात रात्रीचे विशेष क्षेत्र (झोन) प्रशासनाने विकसित करावे.  
– तेजश्री पोवळे- इंटिरियर डिझाइनर, ठाणे
’’’
अभियांत्रिकी क्षेत्रात सततचे प्रकल्प, एकत्रितरीत्या अभ्यास करावा लागतो, अशा वेळी जर रात्री भूक लागली तर शहरापासून कोठे तरी दूर असणाऱ्या दुकांनावर जावे लागते. त्यापेक्षा प्रशासनानेच काही विक्रेत्यांना रात्रीचे दुकान अथवा उपाहारगृहे सुरू ठेवण्याचे परवाने द्यावेत आणि फक्त ती दुकाने रात्रभर सुरू ठेवावी.
विनायक पदमने, ठाणे