ग्रामीण भागात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती जाणवत असताना टोलेजंग इमारतीत बहुतेकदा मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होताना दिसते. ठाण्यातील निहारिका सोसायटीतील रहिवासी मात्र या पाण्याच्या गैरवापरापासून दूर राहत पाणी बचतीसाठी आदर्श ठरत आहेत. अयोग्य व्यवस्थापनामुळे काही भागांत भरमसाट पाणी तर एकीकडे पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते. निहारिका सोसायटीमध्ये पाण्याचा साठा होत आहेच, याशिवाय जमा झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. सोसायटीच्या आवारातच सांडपाणी पुनप्र्रक्रिया करण्याची सुविधा आहे. रहिवाशांनी दैनंदिन कामासाठी वापरलेले पाणी पुनप्र्रक्रियेसाठी पाठवून फ्लशसाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. तसेच सोसायटीच्या आवारातील बगिच्याची देखभाल, झाडांना पाणी देण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो. यामुळे निहारिका सोसायटीमध्ये दिवसाला साठ ते सत्तर लिटर पाण्याची बचत होते. वापरण्यायोग्य नसते असे पाणी फेकून न देता सोसायटीच्या परिसर देखभालीसाठी त्याचा वापर होत असल्याने मोठय़ा प्रमाणात पाण्याची बचत होते, असे निहारिका सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण अगरवाल यांनी सांगितले.

सोसायटीच्या आवारात पर्जन्य जलसंधारण सुविधा
निहारिका सोसायटीमधील रहिवाशांच्या पुढाकाराने सोसायटीच्या आवारातच पर्जन्य जल संधारण सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. पावसाचे साठवलेले पाणी पिण्यायोग्य नसले तरी दैनंदिन कामकाजासाठी या पाण्याचा वापर करता येतो. एसीमधून गळणाऱ्या पाण्याचाही साठा करून या पाण्यावर प्रक्रिया करून सोसायटीच्या आवारात लागणाऱ्या स्वच्छतेसाठी, वाहने धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग करता येईल का, याचा प्रयत्न रहिवासी करीत आहेत.