पालिका आयुक्तांचे अग्निशमन केंद्रांना आदेश
वसई-विरारमध्ये आणखी नऊ अग्निशमन केंद्रे उभारणार
वसई-विरार शहराभोवती अग्निसुरक्षा कवच तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शहरात सध्या तीनच अग्निशमन केंद्रे असल्याने अग्निसुरक्षा व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरात आणखी नऊ अग्निशमन केंद्रे उभारण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी जाहीर केला. त्याच वेळी शहरात कोठेही आगीची घटना घडली की वर्दी मिळाल्यानंतर पाच मिनिटांत अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचले पाहिजे, असा सज्जड दमच आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय बचाव पथक आणि अग्निशमन पथक स्वतंत्र करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.
वसई-विरार शहरात अवघे तीेन अग्निशमन केंद्रे आहेत. तसेच या केंद्रातील अनेक कर्मचारी हे अन्य विभागातून बदली करण्यात आलेले व अप्रशिक्षित असल्याने आगीसारख्या दुर्घटनांबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने अलीकडेच दिले होते. त्याची दखल घेत आयुक्त सतीश लोखंडे यांनी नुकताच अग्निशमन विभागाची बैठक घेऊन एकूण व्यवस्थेचा आढावा घेतला. महाराष्ट्र अग्निशमन कायदा २००६ च्या नियमावलीे नुसार या विभागात अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
वसई-विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाला मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचे पदच आजवर भरले गेलेले नव्हते. ते पद तात्काळ भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सध्या आचोळा, वसई आणि विरार या तीन ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. एवढय़ा मोठय़ा शहराला ते तुटपुंजे असल्याने वेळेवर बचाव पथक पोहोचू शकत नव्हते. त्यासाठी शहरात नऊ नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जाणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्याच्या जागा शोधण्याचे आणि तरतूद करण्याचे आदेश मुख्यलेखाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या अग्निशमन विभागात २५० पदे मंजूर असले तरी केवळ २३० कर्मचारी आणि जवान आहेत. उर्वरित पदे भरणे आणि नवीन पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे जवान सध्या कार्यरत आहेत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या जवानांना अनुभवाच्या निकषावर सेवेत कायम केले जाणार आहे.
आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर पाच मिनिटांत मदत घटनास्थळी पोहोचली पाहिजे, असे आयुक्तांनी या बैठकीत बजावले. आतापर्यंत शहरातील छोटय़ा-मोठय़ा बचावकामांची जबाबदारीही याच विभागाकडे होती. त्यामुळे अगदी एखाद्या ठिकाणी पक्षी अडकला तरी अग्निशमन दलाच्या जवानांनाच धावावे लागत होते. मात्र, यापुढे बचाव पथक आणि अग्निसुरक्षा पथक स्वतंत्र करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.