खासगी रुग्णालयांमध्ये उपचार

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली असून मीरा-भाईंदरमध्ये नऊ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यातील चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे शासकीय प्रयोगशाळेत सिद्ध झाले असून उर्वरित पाच जण हे डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. लागण झालेले सर्व रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थित असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

डेंग्यूची लागण झाल्याच्या संशयावरून एकंदर नऊ रुग्णांच्या रक्ताचे नमुने ठाणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील चार जणांना डेंग्यू असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

उर्वरित पाच रुग्णांचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याने ते सध्या संशयित रुग्ण मानले जात आहेत. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्ण सापडलेल्या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून परिसरात औषधाची फवारणी करण्यात आली आहे, तसेच आसपासच्या नागरिकांच्या रक्तांचे नमुने तपासणासाठी गोळा करण्यात आले आहेत.

पालिकेचे आवाहन

डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालत असल्याने घरात अथवा घराच्या आसपास पाणी साठून देऊ नका, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणारे मलेरिया, कावीळ, अतिसार यांसारखे इतर आजार नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.