भाईंदर येथील घटना; दोघांना अटक

औरंगाबाद येथून भाईंदर येथील आपल्या नातेवाईकांकडे शिकण्यासाठी आलेल्या भारती चव्हाण या नऊ वर्षीय मुलीचा तिच्या नातेवाईकांनीच निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मृतदेहाची दरुगधी पसरू नये यासाठी आरोपींनी घरातील पिंपामध्ये तिचा मृतदेह टाकून त्यात सिमेंट ओतले होते, अशी बाब तपासात पुढे आली आहे. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण अद्यापही पसार आहे. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नसून अटक आरोपींच्या तपासात ही बाब उघड होण्याचीशक्यता आहे.

अनिता राठोड आणि आकाश चव्हाण अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर अनिताचा पती प्रकाश राठोड याचा पोलीस शोध घेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ामध्ये हिना चव्हाण (२८) या राहतात. त्यांचे पती नवनाथ यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. हिना यांना भारती (९) ही एकच मुलगी आहे. भारती हिला शिक्षणासाठी मुंबईत नेतो, असे सांगून हिना यांचा मावस दीर प्रकाश राठोड हा भारतीला सहा महिन्यांपूर्वी भाईंदर येथील उत्तन येथे घेऊन आला होता.

अनेक दिवस मुलीशी संपर्क होत नसल्यामुळे हिना यांनी राठोड कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधून विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे त्यांनी औरंगाबाद येथील पोलीस ठाणे गाठले; परंतु हे प्रकरण भाईंदर येथील असल्यामुळे त्याच ठिकाणी जाऊन तक्रार नोंदविण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. त्यानंतर त्यांनी ४ डिसेंबरला उत्तन सागरी पोलीस ठाण्यात जाऊन भारती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाईंदर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत भोसले आणि सहायक पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाने मुलीचा शोध सुरू केला. या तपासादरम्यान पथक प्रकाश राठोडच्या घरी पोहचले. मात्र, त्या वेळेस तो घरात सापडला नाही. त्यामुळे पथकाने प्रकाशची पत्नी अनिता हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यामध्ये प्रकाश आणि आकाश या दोघांच्या मदतीने भारतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने अनिता आणि आकाश या दोघांना अटक केली, तर फरार असलेल्या प्रकाशचा शोध सुरू केला आहे.

झाले काय?

उत्तन येथील घरी आणल्यानंतर प्रकाश याने हिनाला शाळेत पाठविले नाही. याउलट प्रकाश आणि त्याची पत्नी अनिता हे दोघे तिच्याकडून घरकाम करून घेत होते. ७ नोव्हेंबरला तिने कपडय़ांमध्येच लघुशंका केली. त्यामुळे प्रकाशने तिला मारहाण केली होती. या मारहाणीनंतरच तिचा गळा दाबून खून करण्यात आला, अशी बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. असे असले तरी भारतीला शिक्षणाच्या नावाखाली वाम मार्गी लावण्यास आणले असावे असा अंदाज आहे. मात्र, तिच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

भारतीचा खून केल्यानंतर प्रकाश आणि अनिताने तिचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि त्यानंतर घरातील रिकाम्या पिंपामध्ये ती बॅग भरली. या मृतदेहाची दरुगधी पसरू नये यासाठी त्यांनी त्यावर सिमेंट ओतले. प्रकाश याने त्याचा भाचा आकाश चव्हाण याला घरी बोलावले. त्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर, या तिघांनी एक टेम्पो भाडय़ाने घेऊन त्याद्वारे १२ नोव्हेंबरला रात्री कसारा घाटात हा मृतदेह रस्त्यालगत असलेल्या दरीत फेकून दिला होता. मृतदेह पोलिसांनी शोधून काढला आहे.