जिल्ह्य़ात ३३ घरांचे नुकसान, १९२ वृक्ष कोसळले

ठाणे : जिल्ह्य़ात निसर्ग वादळाच्या तडाख्याने ३३ घरांचे नुकसान झाले, तर १९२ वृक्ष उन्मळून पडले. मात्र, वर्तविण्यात आलेल्या अंदाजापेक्षा वादळाचा कमी फटका जिल्ह्य़ाला बसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. खाडी किनारी आणि सखल भागात राहणाऱ्या ३ हजार ९० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. वादळात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रत्यक्षात या वादळाने दिशा बदल्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा निसर्ग चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला कमी प्रमाणात बसला. असे असले तरी बुधवारी जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत होते. त्याच वेळेस जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. या काळात दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह प्रशासनाने खाडीकिनारी तसेच सखल भागात राहणाऱ्या आणि कच्च्या घरात वास्तव्यास असलेल्या ३ हजार ९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.

वाहनांचे नुकसान

चक्रीवादळाच्या काळात झालेल्या वादळी पावसामुळे उल्हासनगर शहरातील ११, भिवंडीतील २, मुरबाडमधील १४, शहापूरमधील ३ आणि अंबरनाथ ३ अशा एकूण ३३ घरांचे नुकसान झाले. या घरांचे स्थानिक प्रशासनामार्फत तातडीने पंचनामे करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. तर, वादळी वाऱ्यांमुळे ठाणे शहरात ५३, कल्याणमध्ये ५०, भिवंडीमध्ये ११, मिरा-भाइंदर ११, उल्हासनगरमध्ये ३८, अंबरनाथमध्ये १५ आणि बदलापूरमध्ये १४ अशी १९२ झाडे उन्मळून पडली आहेत. यापैकी अनेक झाडे विद्युत वाहिन्यांवर पडल्याने अनेक शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर, शिळ-डायघर परिसरात एका गाडीवर वृक्ष उन्मळून पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. तसेच उल्हासनगर शहरात विजेचा एक खांब कोसळला आहे, तर या कल्याणमधील ३ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.