नितीन कंपनी चौकात सिग्नल यंत्रणा सुरू; अचानक झालेल्या बदलामुळे रहदारीचा गोंधळ; वाहतूक कोंडीत आणखी भर

रस्त्यावरील सिग्नल वाहतुकीचे नियमन करण्यात मदत करत असले तरी, ठाण्यातील नितीन कंपनी चौकात सिग्नलमुळे वाहतुकीचे तीनतेरा उडाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा बुधवारी अचानक सुरू करण्यात आली. मात्र एरव्ही या शिस्तीची सवय नसलेल्या वाहनचालकांचा त्यामुळे गोंधळ उडाला व या चौकाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गुरुवारी या परिसरातील तीन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी २० ते २५ मिनिटे मोजावी लागली.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर नितीन कंपनी चौक असून तो महामार्गासह शहराच्या अंतर्गत मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून या चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बंद करून येथे वर्तुळाकार पद्धतीने वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे ही योजना फसली होती. सकाळ आणि सायंकाळी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून चौकातील वाहतूक नियंत्रित केली जाते. असे असतानाच या चौकातील सिग्नल यंत्रणा तीन दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याची बुधवारपासून अंमलबजावणी सुरू केली. अचानकपणे झालेल्या बदलामुळे चौकाला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

नितीन कंपनी चौक ते कामगार रुग्णालय आणि नितीन कंपनी चौक ते महापालिका मुख्यालयपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. तसेच कामगार रुग्णालयासमोरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरूअसून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. याशिवाय, नितीन कंपनी चौक ते कामगार रुग्णालय या मार्गावर फेरीवाले आणि मासळी विक्रेतेही बसत असून यामुळेही वाहतुकीस पुरेशी मार्गिका उपलब्ध होत नाही. असे असतानाच सिग्नल यंत्रणेमुळे या मार्गावरील वाहतूक काही मिनिटांसाठी रोखून धरली जात होती. त्यामुळे गुरुवारी या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कामगार नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्या होत्या. त्यामुळे तीन मिनिटांच्या अंतरासाठी २० ते २५ मिनिटांचा अवधी लागत होता.

लोकाग्रहास्तव नितीन जंक्शन येथील सिग्नल यंत्रणा तीन दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आली आहे. तीन दिवसांतील वाहतूकीचा आढावा घेऊन या बदलाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. – अमित काळे, उपायुक्त- ठाणे वाहतूक पोलीस