पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने कल्याण-डोंबिवली पालिका हतबल

पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मागणी केल्यास स्थानिक पोलीस ठाण्याने तातडीने पालिकेला बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, असे सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे पोलीस प्रशासनाला आदेश आहेत. मात्र या आदेशाची कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अंमलबजावणीच होत नसल्याच्या तक्रारी आहेत. २७ गावांच्या हद्दीत, डोंबिवली पश्चिमेत उभी राहिलेली बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रभाग कार्यालयांनी विष्णुनगर, मानपाडा पोलीस ठाण्यांकडे केली आहे. मात्र या पोलीस ठाण्यांकडून पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पालिका अधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात येत आहे.

डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीसह अन्य बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी पालिकेच्या ‘ह’ प्रभागाने विष्णुनगर     पोलीस ठाण्याला तीन महिन्यापूर्वी केली आहे. पोलिसांनी या पत्राची दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात नेमाडे गल्लीतील सात माळ्याचे बेकायदा बांधकाम पूर्ण झाले आहे. या बेकायदा इमारतीत भूमाफियांनी रहिवासी घुसविण्यास सुरुवात केली आहे. सामान्य, गरजू ग्राहकांना अशा बेकायदा इमारतीत घर देऊन भूमाफिया लोकांची फसवणूक करीत आहेत. नेमाडे गल्लीतील बांधकाम करणारे विकासक महेश पार्टे यांच्यावर पालिकेने एमआरटीपी अंतर्गत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरीही भूमाफियाने हे बांधकाम पूर्ण केले आहे, असे या प्रकरणातील तक्रारदार विनोद जोशी यांनी सांगितले.

नेमाडे गल्ली व इतर बांधकामांवर कारवाई का करण्यात येत नाही, या प्रश्नावर ‘ह’ प्रभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी विष्णुनगर पोलिसांना पत्र दिले आहे, एवढेच तकलादू कारण दिले आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात संपर्क केला, की ‘आम्हाला काय तेवढेच काम आहे का’ अशी उत्तरे दिली जातात, असे जोशी म्हणाले.

डोंबिवली पूर्वेतील ‘ई’ प्रभागाच्या हद्दीतील नांदिवली पंचानंद येथील विकास आराखडा रस्त्यामधील व लगतची बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी ई प्रभागाने मानपाडा पोलीस ठाण्याला वारंवार पत्रे दिली आहेत. पण पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने ही बांधकामे तोडणे शक्य होत नाही.

बंदोबस्त न घेता बांधकामे तोडण्यासाठी गेले की बांधकामधारक संतप्त होऊन अंगावर येतात. त्यांच्याकडून जिवाला इजा होण्याची भीती असते. गेल्या दोन महिन्यापूर्वी भूमाफियाने नांदिवलीत एका पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती, असे ई प्रभागातील अधिकाऱ्याने सांगितले.  याबाबत अधिक माहितीसाठी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या सतत संपर्क करूनही त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.

अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी पालिकेकडून कारवाई करताना कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती असते. त्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. पालिकेकडून जशी मागणी होते, त्याप्रमाणे परिस्थितीचा विचार करून बंदोबस्त देण्याची कार्यवाही केली जाते.  परमबीर सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे