लोढा हेरिटेज, डोंबिवली
tv11लोढा हेरिटेज.. डोंबिवलीपासून हाकेच्या अंतरावर वसलेले एक गृहसंकुल. निसर्गरम्य परिसर, हिरवीगार वनश्री, शांत वातावरण, मोकळी हवा, आलिशान सदनिका.. बाहेरून पाहिले तर प्रत्येकालाच आपले घर इथे असावे असे वाटेल. मात्र येथील रहिवाशांना विचाराल तर, ते ‘या वरलिया रंगा भुलू नका’ असाच सल्ला देतात. ‘दिसतं तसं नसतं’ याची प्रचीती डोंबिवली येथील लोढा हेरिटेजवासीयांचे अनुभव ऐकले तर हे पटते.  
 ठाणे व कल्याण डोंबिवली या महापालिका क्षेत्रालगत असली तरी ही वसाहत भोपर ग्रामपंचायतींच्या हद्दीत येते. त्यामुळे हे संकुल लगतच्या इतर २७ गावांप्रमाणे सोयीसुविधांपासून कायम वंचित राहिले आहे.

मुंबईतील धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या रहिवाशांना निसर्गसौंदर्याला भुलून कल्याण व डोंबिवली या दोन शहरांजवळ असलेल्या लोढा हेरिटेज येथील गृहसंकुलात  घरे घेतली. १९९०-९१ मध्ये या प्रकल्पाची उभारणी झाली. १९९२ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. सरकारी नोकरी करणारे तृतीय चतुर्थ श्रेणीतील कामगार येथे मोठय़ा प्रमाणात आले, कारण अगदी  दहा लाखांमध्ये येथे घर मिळत होते. सुरुवातीला येथे नऊ कुटुंबे वास्तव्यास आली. त्यानंतर हळूहळू वस्ती वाढत गेली. अन्य सेवा क्षेत्रांतील नागरिकांनीही येथे राहण्यासाठी धाव घेतली. या भागात १२ सदनिकांमध्ये एकूण ५२ विंग्ज आहेत. त्यात सुमारे हजारो रहिवासी वास्तव्य करत आहेत.
निसर्गरम्य परिसर, मोकळे वातावरण याशिवाय येथे जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते, वीज, पाणी या कोणत्याही सेवा सुविधा नव्हत्या. कालांतराने त्या मिळतील, ही येथील रहिवाशांची अपेक्षाही फोल ठरली. ‘लोढा’ने सुरुवातीला राहायला आलेल्या ९ कुटुंबांतील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी मॅटोडोरची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र यांच्या घरातील सदस्यांना स्टेशन गाठण्यासाठी शंकेश्वर नगर येथे चालत जाऊन तेथून रिक्षा करावी लागत असे. परिवारातील सदस्यांची हेळसांड थांबविण्यासाठी या नागरिकांनी मिळून खासगी ट्रॅव्हल बसची सुविधा परिसरात सुरू केली. प्रत्येक सदनिकाधारकास २०० रुपये भाडे ठरविण्यात आले. मात्र रहिवाशांनी पास थकविल्याने ही सुविधा तीन वर्षांतच बंद पडली. केडीएमटीची बस येथे येत नाही. यामुळे नागरिकांना रिक्षाशिवाय पर्यायच उरलेला नाही. रिक्षाचालकांनीही त्यांची मजबुरी लक्षात घेऊन लूटमार सुरू केली. येथे येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ४० रुपये भाडे आकारले जाते. २००६ मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने खासगी बसची सुविधा येथील विभागाला उपलब्ध झाली. या बसमधून हेरिटेजशेजारील भद्रानगर, नवनीत नगर, बैठय़ा चाळी व गावातील नागरिकही प्रवास करू लागले. तेव्हा एका घरामागे २५० रुपये भाडे होते.  आता ३५० रुपये बसभाडे झाले आहे. नांदिवली पूल धोकादायक झाल्याने तेथून जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हेरिटेज येथून सुटणारी बस आता नांदिवली गावात थांबते. तेथून पूल ओलांडून प्रवासी सुनीलनगर गाठतात आणि तेथे दुसऱ्या बसमध्ये बसून ते स्टेशनपर्यंतचा प्रवास करतात. यामुळे दररोज सकाळी कामावर जाण्यासाठी नागरिकांना असा द्राविडी प्राणायाम करावा लागतो.   
येथील नागरिकांना नांदिवली गावातून जाणारा रस्ता माहिती नव्हता. त्यामुळे ते मानपाडा रोड येथूनच प्रवास करीत होते.  लोढाने सुरुवातीला सिमेंटचा रस्ता बनवून दिला होता. मात्र त्या वेळी खडी, माती, वाळूचे ट्रक येथून जात असल्याने काही महिन्यांतच या रस्त्याची चाळण झाली, तो आजतागायत बनलेला नाही. या विभागात पूर्वी मातीचे रस्ते होते. महापालिकेतून ही गावे वगळण्यात आल्यानंतर तर इकडे प्रशासन नावाची गोष्टच शिल्लक राहिली नव्हती. अखेर रहिवाशांनी एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांकडे कायम तगादा लावला. निवडणुकीत उत्तर देऊ, अशी धमकी दिली तेव्हा काही प्रमाणात रस्त्यांच्या कामांकडे लक्ष दिले गेले. सध्या दर्शनी रस्ता आणि चौक सुभोभित दिसत असला तरी अंतर्गत भागातील रस्त्यांची चाळण कायम आहे.
‘घी देखा लेकिन बडगा नही’ अशी येथील रहिवाशांची अवस्था आहे. निसर्गरम्य परिसर वगैरे ठीक आहे. मात्र डोंगराच्या गुहेत जाऊन कायमचे कुणी राहू शकत नाही. इथे सुरुवातीच्या काळात विजेचे लपंडाव, अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होता. त्यामुळे दिवस काढायचे कसे, असा प्रश्न रहिवाशांना पडला. सुरुवातीला चक्क गावात जाऊन नागरिक पाणी भरत होते. मात्र तेही केवळ २० मिनिटे येत असल्याने पर्याय म्हणून प्रत्येक इमारतीने बोअरवेल खोदल्या आहेत. त्यातही काहींना पाणी लागले, तर काहींना नाही. गेली कित्येक वर्षे या भागात वीजच नव्हती. नागरिक अंधारातच दिवस काढत होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि त्यांना वीज मिळाली.
महिलांसाठी असुरक्षित
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी येथे महिलांनी ये-जा करणे सुरक्षित नाही. गावातील मुले रात्रीच्या वेळी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढतात.  ते भर रस्त्यात बाइकचे स्टंट शो करतात. ते रोखण्यासाठी रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावायला हवेत. हेरिटेजमध्ये पोलीस कर्मचारी वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांनी अनेकदा येथे पोलीस चौकी असावी, अशी मागणी केली. मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही. पोलीस असूनही त्यांच्याच महिलांना ते सुरक्षितता देऊ शकत नाहीत याची त्यांना खंत आहे. रिक्षा, बसमधूनही प्रवास करणे सुरक्षिततेचे नाही. गावातील मुले रात्रीच्या वेळेस पाठलाग करत येत असल्याचे स्वत: अनुभवले असल्याचे येथील रहिवाशी रोशनी पाटेकर यांनी सांगितले.
आरोग्य सुविधेचा अभाव
इतक्या मोठय़ा वसाहतीत रुग्णालयाची सुविधा नाही. दवाखाने असले तरी एकही एमबीबीएस डॉक्टर येथे नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी ताप आला, तर डॉक्टरच रुग्णांना डोंबिवलीतील दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. अनेकदा वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. कुंदना व संदीप माळी यांनी एका रुग्णवाहिकेची सुविधा वसाहतीला दिली आहे. त्याद्वारे आम्ही रुग्णांना मुंबईला हलवितो. या वसाहतीत एखाद्या चांगल्या दवाखान्याची आवश्यकता आहे, असे स्थानिक रहिवासी संदीप साने याने सांगितले.  
विद्यार्थ्यांसाठी येथे शाळा, महाविद्यालयाची सोय नाही. येथील विद्यार्थी लोढा हेवन किंवा डोंबिवलीतील शाळेत जातात. त्यामुळे त्यांचा अर्धा-अधिक वेळ प्रवासातच जातो. गावकरी कायम दमदाटी करतात. ‘आमच्या गावात तुम्ही राहता’ असे सुनावतात. रस्ते, पाणी, वीज, उद्यान, शाळा, रुग्णालये या सुविधा देण्याचे आश्वासन लोढाने दिले होते. मात्र त्यापैकी कोणत्याही गोष्टी प्रत्यक्षात आल्या नाहीत. सोसायटी तसेच नागरिकांमध्येही एकोपा नसल्याने कोणत्याच समस्यांचा पाठपुरावा होत नाही. येथील एक उद्यान नावाची इमारत मोडकळीस आली आहे. रहिवाशांनी एक लाख रुपये काढून इमारतदुरुस्तीचे काम सुरू केले आहे. लोढा असोसिएशन कमिटीवर कोण सदस्य आहेत, त्यांची कधी बैठक होते याचा गेल्या कित्येक वर्षांत आम्हाला थांगपत्ता लागलेला नाही, असे सुनील रेडकर यांनी सांगितले.
गृहसंकुलातून दरमहा प्रत्येक सदनिकेमागे देखभाल खर्च वसूल केला जातो. मात्र वीज, पाणी देयकाचा भरणा करण्यासाठी ते पैसे पुरत नाहीत. त्यामुळे येथील नागरी सुविधांचा प्रश्न गंभीर होत आहे. त्या सोडवण्यासाठी जो निधी गृहप्रकल्पात असणे आवश्यक होते, तेवढा तो जमा होत नाही. त्यामुळे वसाहतीचा आर्थिक कणा मोडला आहे. ग्रामीण भागात अजूनही नवनव्या टोलेजंग इमारती आता उभ्या राहात आहेत. ज्या नागरिकांना महागडी घरे परवडत नाहीत ते आपसूकच या घरांकडे वळत आहेत. मात्र येथील केवळ लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुरता भ्रमनिरास झालेल्या येथील काही जुन्या रहिवाशांनी अनुभवांती अन्यत्र स्थलांतरित होण्याचा मार्ग पत्करला आहे.
‘नाही रे’चा पाढा  
* स्मशानभूमी नसल्याने डोंबिवलीतील शिवमंदिर येथील स्मशानभूमीत जावे लागते, कारण भोपर येथील स्मशानभूमीचा ग्रामस्थ वापर करू देत नाहीत.
* रस्त्याची चाळण झालेली आहे. वाहनतळ नाही. त्यामुळे गल्लीबोळात, पदपथावर वाहने उभी करावी लागतात.
* भाजी मार्केट, मच्छी मार्केट नसल्याने त्यासाठी डोंबिवली गाठावे लागते. त्यामुळे वेळेला नाइलाज म्हणून हेरिटेज परिसरात केवळ एकमेव असलेल्या भाजी विक्रेत्याकडून तो सांगेल त्या किमतीला शिळ्या आणि हलक्या दर्जाच्या भाज्या विकत घ्यावा लागतात.
* प्रकल्पाच्या आवारात प्रसाधनगृह, पोलीस चौकी, नाटय़गृह, उद्याने नाहीत.
भारनियमन व ग्रामीण परिसरामुळे विजेचा कायम लपंडाव सुरू असतो. स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नाही. त्यामुळे अशा वेळी डोंबिवली केंद्राला दूरध्वनी करावा लागतो.
शर्मिला वाळुंज