शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही

किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे – करोना या विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात झाला असून त्याची ठाणे जिल्ह्य़ालाही बसलेली आहे. जिल्ह्य़ात करोना बाधितांचा आकडा वाढत असताना गोदामांचे आणि कारखान्यांचे शहर म्हणून ओळख असलेले भिवंडी शहर करोनाच्या संसर्गापासून सुदैवाने दूरच आहे. संपूर्ण भिवंडीत करोनाचा एकही रूग्ण नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद, पोलीस, महापालिका यांच्या समन्वय आणि प्रयत्नांमुळे हे शक्य होत झाल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात झाला असून जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई यांसारख्या मोठय़ा शहरांतही करोनाचे रूग्ण आढळले आहेत. भिवंडी हे शहर ठाणे जिल्ह्य़ातील महत्त्वाचे शहर असून येथील काही भाग भिवंडी महापालिकेच्या तर काही भाग जिल्हा परिषदेच्या आख्त्यारीत येतो. भिवंडीतील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्याही लाखांच्या घरात असून शहरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे आहेत. तर कारखानेही या भागात मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे यासह देशातील विविध राज्यांतून वस्तूंची या गोदामात ने-आण होत असते. तसेच उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथील मजूर देखील या भागात मोठय़ा प्रमाणात राहतात. त्यामुळे जिल्ह्य़ातील इतर शहरांप्रमाणे भिवंडीतही करोनाचा धोका बळावू शकत होता. असे असतानाही पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाने वेळीच सावध होत पावले उचलल्याने हे शहर सध्यातरी करोना विषाणूपासून मुक्त आहे.

भिवंडीत महापालिकेने बेघर आणि मजुरांची माहिती तयार केली. या सर्व बेघरांना निवारे, जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली. तसेच करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून येथील भाग र्निजतुकीकरण केले. भिवंडीत १२१ ग्रामपंचायती असून लोखसंख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. गावातील विवाह सोहळे टाळणे असे मोठे आवाहन जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर होते. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन नियोजन केल्यामुळे प्रकार टाळता आले.

पोलिसांनीही ठाणे, कल्याण येथून येणाऱ्या वेशींवर ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक असलेली फलके लावण्या आली होती. त्या फलकांवर करोना विषयी शंका किंवा समस्या असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यांसह पोलिसांकडून मजूरांना निवाऱ्यापर्यंत पोहोचण्यास मदत केली जात आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या नमाजामुळे गर्दी टाळण्यास उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी ध्वनीफित प्रसारित केली होती. मुस्लिम बांधवांनी मशीदीमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला भिंवडीतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद दिला. सर्वच प्रशासकीय यंत्रणांमुळे येथील नागरिकांसोबत प्रशासनाचा थेट संपर्क होत असल्याचे चित्र आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. ही नाकाबंदी नागरिकांच्या फायद्याची आहे. पोलीस जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळे आमच्या गावातील नागरिकही पोलिसांना पाणी, जेवण पुरवित आहोत.

– विनोद पाटील-भरोडीकर, रहिवासी, भिवंडी.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन सुरूवातीपासूनच एकमेकांशी समन्वय साधत आहे. गावातील स्वच्छता राखण्याचे काम सुरूच असते. परदेशातून कोणी आले आहे का याची माहिती गोळा केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना गावात प्रवेश देणे टाळले जात आहे. तसेच करोनाच्या जनजागृतीसाठी दवंडी, पत्रकेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येते.

– डॉ. प्रदीप घोरपडे, गटविकास अधिकारी, भिवंडी.